यवतमाळात देहविक्रीचा बाजार पुन्हा गरम; अमरावतीचा तडीपार दलाल सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:51 IST2021-12-01T17:50:41+5:302021-12-01T17:51:09+5:30
Prostitution : आता पुन्हा अमरावतीतील तडीपार दलालाने दारव्हा मार्गावरील जे. एन. पार्कमध्ये बस्तान बसविले आहे, तर आर्णी रोडवर राहुलचा कुंटणखाना सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.

यवतमाळात देहविक्रीचा बाजार पुन्हा गरम; अमरावतीचा तडीपार दलाल सक्रिय
यवतमाळ : शहरातील सामाजिक स्वास्थ्याला कलंक असलेला देहविक्रीचा व्यापार गेल्या काही दिवसांपासून पुन्हा फोफावला आहे. वर्षभरापूर्वी पाेलिसांनी पिटा कारवाई करीत देहविक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता पुन्हा अमरावतीतील तडीपार दलालाने दारव्हा मार्गावरील जे. एन. पार्कमध्ये बस्तान बसविले आहे, तर आर्णी रोडवर राहुलचा कुंटणखाना सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.
पश्चिम बंगाल व नागपूर येथून मुलींना आणून देहव्यापार करण्यास भाग पाडले जाते. बऱ्याचदा ग्रामीण भागातील मुलींनाही नादी लावण्याचे काम करण्यात येते. अमरावती शहरातील तडीपार असलेला रोशन ऊर्फ अवी याने यवतमाळातील दारव्हा मार्गावर कुंटणखाना थाटला आहे. या मार्गावरील एकवीरा चौकातील निवासी संकुलातील कुंटणखान्याचे पोलिसांनी कारवाई करून उच्चाटन केले. मात्र लगेच लोहारा पोलिसांच्या हद्दीत दुसरा कुंटणखाना सुरू झाला आहे. तेथे स्वतंत्र घर घेऊन हा व्यवसाय चालविला जात आहे. आर्णी येथील मनोज ऊर्फ राहुल याने आर्णी रोडवर घर घेतले आहे. तेथे कुंटणखाना सुरू आहे. तीन महिन्यापूर्वी पोलिसांनी या ठिकाणी धाड घातली होती. मुलगी व ग्राहकही रंगेहात मिळाला होता. पण कुंटणखाना चालविणारा राहुल पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र ही कारवाई रेकॉर्डवर आली नाही. एका टोळीचा सदस्य असलेला सराईत कारवाईत हाती लागला होता. त्यामुळे प्रकरण रफादफा झाले.
दोन दलालांची चलती
सध्या देहविक्रीच्या व्यापारात या दोन दलालांची मोठी चालती आहे. पोलिसांना त्यांच्या एकूण अवैध कारभाराबाबत परिपूर्ण माहिती आहे. त्यानंतरही विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई केली जात नाही. क्रिकेट सट्ट्यातील काहींनीसुद्धा या दलालामार्फत गुंतवणूक सुरू केली आहेे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी नवी विषवली शहरात फोफावत आहे.