XII student suicide in Nagpur: victim of blue whale or PUBG? | नागपुरात बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या : ब्ल्यू व्हेल की पबजीचा बळी?

नागपुरात बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या : ब्ल्यू व्हेल की पबजीचा बळी?

ठळक मुद्देपाचव्या माळ्यावरून उडी मारली , एमआयडीसीत उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुखवस्तू कुटुंबातील बारावीच्या एका हुशार विद्यार्थ्याने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरीतील निलगिरी अपार्टमेंटमध्ये सोमवारी भल्या सकाळी ही थरारक घटना घडली. आयुष क्षीरसागर भोयर (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने कसल्याही प्रकारची सुसाईड नोट अथवा कोणताही निरोप मागे ठेवला नाही. त्यामुळे आयुषने पबजी किंवा ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या गेमच्या नादी लागून आत्मघात केला की काय, अशी शंका घेतली जात आहे.
आयुषचे वडील क्षीरसागर भाऊरावजी भोयर (वय ४८) शासकीय विभागात अभियंता म्हणून सेवारत आहेत. कांचनगंगा-२ मधील निलगिरी अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर आयुष आई, वडील आणि छोटा भाऊ भूषण (वय १३) यांच्यासोबत राहायचा. तो बारावीत शिकत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वत्र ओळखला जायचा.
भोयर कुटुंबातील सदस्य भल्या सकाळीच जागतात. आयुषही रोज सकाळी उठून फिरायला जायचा. तिकडून आल्यानंतर शिकवणी आणि कॉलेज असा त्याचा दिनक्रम होता. नेहमीप्रमाणे सोमवारी भल्या सकाळी उठल्यानंतर ५.४५ मिनिटांनी त्याने आईला फिरून येतो, असे सांगितले. आईने नित्यबाब म्हणून त्याला होकार दिला अन् घरकामात व्यस्त झाल्या. काही वेळेनंतर इमारतीवरून काही तरी पडल्याचा त्यांना आवाज आला. त्यामुळे आईने गॅलरीतून खाली बघितले. आयुषचे कपडे दिसल्याने आई घाबरली अन् तिने आयुषच्या वडिलांना सोबत घेऊन खाली धाव घेतली. खाली आयुष पडून होता. त्याच्या डोक्यातून आणि दोन्ही पायातून रक्त निघत होते. त्यांनी लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने आयुषला उपचाराकरिता वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सोमवारी सायंकाळी ४.३१ ला आयुषला मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अंधारात
रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी आयुषच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधला. तो बाहेर फिरायला जातो, असे सांगून गेला एवढीच माहिती आईकडून मिळाली. पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आयुष रविवारी सायंकाळी इमारतीत शिरताना दिसला, नंतर तो बाहेर पडताना पोलिसांना आढळलाच नाही. त्यामुळे त्याने आईला फिरायला जातो, असे सांगून सरळ इमारतीचे टेरेस गाठले आणि तेथून उडी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आयुष सुखवस्तू कुटुंबातील मुलगा होता. तो हुशारही होता. त्यामुळे त्याने आत्महत्या करावी,असे कोणतेही कारण दिसत नाही. ब्ल्यू व्हेल आणि पबजीच्या नादी लागलेली मुले अशा प्रकारचे आत्मघातकी कृत्य करून घेतात. गेल्या वर्षी अजनीतील एका मुलानेही बहुमजली इमारतीवर चढून आत्महत्या केली होती.

 

Web Title: XII student suicide in Nagpur: victim of blue whale or PUBG?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.