पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 23:57 IST2020-08-27T23:55:14+5:302020-08-27T23:57:05+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक
डोंबिवली: पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पानटपरी चालकाने दोन कामगारांच्या मदतीने अन्य एका कामगाराची हत्या केल्याची घटना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी शिताफीने केलेल्या तपासात समोर आली आहे. पानटपरी चालक सुनिल श्रीराजबा पटेल (वय 28) याला अटक करून मानपाडा पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. या घटनेत मृतदेह तलावात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतू गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होण्यापुर्वीच तो उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.
कल्याण-शीळ मार्गावरील मानपाडा हद्दीतील क्लासिक हॉटेलचे पानटपरीमधील काम करणा-या कामगारांची दोन ते चार दिवसांपुर्वी भांडणे झालेली आहेत आणि या भांडणात एकाला जीवे मारण्यात आल्याची माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक राजेंद्र खिल्लारे यांना गुप्त बातमीदारामार्फत गुरूवारी मिळाली. या माहीतीनुसार वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे यांसह अन्य पोलीसांनी संबंधित कामगार राहत असलेल्या ललित काटयाजवळील पांडुरंग वङो कम्पाऊंड या ठिकाणी धाड टाकून पानटपरी चालक सुनिल पटेल याला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने दोन कामगारांच्या मदतीने कामगार सुरीज स्वरूपवा पाल (वय 18) याची हत्या केल्याची कबुली दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत सुरीज हा सुनिलकडे कामासाठी आला होता. दरम्यान पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून सुरीजशी सुनिलचा वाद झाला होता. मागील शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3.30 च्या कालावधीत झालेल्या वादात सुनिलने इतर दोन कामगारांच्या मदतीने लाकडी दांडका, गॅसचा पाईप व कमरेचा पट्टा याने सुरीजला बेदम मारहाण केली आणि त्याचे डोके जमिनीवर आणि भिंतीवर जोरदार आपटले. यात सुरीजचा जागीच मृत्यू झाला. सुनिलला पोलीसांनी अटक केली असून अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची भुमिका बजावणा-या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक खिल्लारे यांचे पानसरेंच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. दरम्यान या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
सुरीजची हत्या 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली. परंतू मृतदेहासह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोणीत भरून क्लासीक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दलदलयुक्त तलावात आरोपींकडून टाकण्यात आला होता. पोलीस तपासात हत्येचा गुन्हा उघडकीस येताच सुरीजचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात
crime