अग्निरोधक सिलेंडरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 18:54 IST2020-01-11T18:54:05+5:302020-01-11T18:54:38+5:30
बदलापूरातील मांजर्ली भागात वुड पिकर इंडिया फायर सर्व्हीस या छोट्या वर्कशॉपमध्ये अग्निरोधक सिलेंडर रिफिलींग करण्याचा व्यवसाय सुरु होता.

अग्निरोधक सिलेंडरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू
बदलापूर : अग्निरोधक सिलेंडर रिफिलींग करत असताना त्या सिलेंडरचा व्हॉल्व फुटून तो छातीला लागल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी दुकान मालकाच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षेची साधने न वापरता हे काम केले जात होते. त्यामुळे दुकानदाराला या प्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे.
बदलापूरातील मांजर्ली भागात वुड पिकर इंडिया फायर सर्व्हीस या छोट्या वर्कशॉपमध्ये अग्निरोधक सिलेंडर रिफिलींग करण्याचा व्यवसाय सुरु होता. त्या ठिकाणी मुदतबाह्य झालेले अग्निरोधक सिलेंडर रिकामे करुन ते पुन्हा भरण्याचे काम करण्यात येत होते. या ठिकाणी गणेश म्हस्के आणि भारत माळी हे दोघे काम करत होते. सकाळी एका सिलेंडरमध्ये प्रेशरने नायट्रोजन टाकण्यात येत असताना त्या सिलेंडरचा व्हॉल्व फुटला व तो म्हस्के यांच्या छातीला लागला. त्यामुळे गणेश हा गंभीर जखमी झाला.
हा प्रकार स्थानिकांना कळताच त्यांनी लागलीच गणेश याला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. तर हा सर्व प्रकार त्याचा सहकारी भारत माळी यांच्यासमोर घडला. माळी याच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर दुकानाचा मालक गौरव बिहाळे याच्या विरोधात पोलिसांनी गणेशच्या मृत्यूस जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे. विहाळे याला पोलिसांनी अटक केली असून पुढे तपास सुरु आहे.