फेसबुकवरची मैत्री पडली महागात; भाईंदरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:32 IST2021-10-23T08:32:04+5:302021-10-23T08:32:21+5:30
लंडनच्या कथित मित्राने पाच लाख युरो डॉलर किमतीच्या जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेची चार लाखांची फसगत झाली आहे.

फेसबुकवरची मैत्री पडली महागात; भाईंदरमधील घटना
मीरा रोड : भाईंदरच्या महिलेने फेसबुकवरून केलेली मैत्री आणि लंडनच्या कथित मित्राने पाच लाख युरो डॉलर किमतीच्या जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेची चार लाखांची फसगत झाली आहे. यासाठी तिला स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागले. याबाबतची तक्रार तिने १९ ऑक्टोबर रोजी पोलिसांत केली.
भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणाऱ्या वैशाली मनीष राजा यांची फेसबुकवर जॉन्सन मायलो या स्वतःला लंडनचा रहिवासी व अभियंता म्हणवणाऱ्याशी मैत्री झाली. दोघांची फेसबुक व नंतर व्हॉट्सॲपवरून चॅटिंग सुरू झाले. त्याने ५ जुलै रोजी भारतात येणार असे सांगून तसे तिकीट पाठवले व आपण पाच लाख युरो डॉलरची जमीन खरेदी करणार असून त्यातले कमिशन तुम्हाला देईन, असे सांगितले.
५ जुलै रोजी त्याने तिला कॉल करून दिल्ली विमानतळावर आपणास कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून माझ्याकडे भारतीय चलन नसल्याने ५० हजार त्वरित पाठवा, असे सांगितले. त्यानुसार बँक खात्यातून तिने ५० हजार पाठवले. त्याने नंतर परत कॉल करून आणखी साडेतीन लाख मागितले. त्यासाठी तिने स्वतःचे मंगळसूत्र, चेन, कडा व हार असे दागिने सराफाकडे गहाण ठेवून ते पैसे बँक खात्याद्वारे पाठवले.
काही वेळाने त्याने पुन्हा कॉल करून आणखी १५ लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीस तर मला जेलमध्ये टाकतील व मी मरेन. पण, आपले शेवटचे संभाषण असल्याने त्याला तू जबाबदार असशील, असा कांगावा त्याने केला. तिने कोणते पोलीस आहेत माझ्याशी बोलणे करून दे, असे सांगितल्यावर ते त्याने टाळले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुन्हा दाखल केला.