डिलर्सना खूश करण्यासाठी महिलांचा डान्स अन्...; कंपनीच्या हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:28 IST2025-10-16T13:20:00+5:302025-10-16T13:28:44+5:30
हैदराबादमध्ये एका फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले.

डिलर्सना खूश करण्यासाठी महिलांचा डान्स अन्...; कंपनीच्या हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा
Hyderabad Rave Party : तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादच्या बाहेरच्या भागात एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात १४ महिलांसह एकूण ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मद्य जप्त केले आहेत. शहरापासून दूर महेश्वरममधील एका फार्महाऊसवर ही पार्टी सुरु होती. पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा टाकला. या छाप्यावेळी अनेक लोक नशेत आढळले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, ही पार्टी एका खासगी समारंभाच्या नावाखाली आयोजित करण्यात आली होती. आयोजकांनी पार्टीचा उद्देश 'डान्स अँड म्युझिक नाईट' असा दाखवला होता, मात्र प्रत्यक्षात येथे मोठ्या प्रमाणात मद्याचे सेवन सुरू होते. ही पार्टी शहरातील काही मोठ्या व्यावसायिकांनी आणि आयोजकांनी एकत्र येऊन केली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये आयटी व्यावसायिक, उद्योजक आणि काही मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित लोकांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महेश्वरम मंडलमधील के. चंद्र रेड्डी रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रॉकस्टार फर्टिलायझर्सच्या मालकीण सईदा रेड्डी आणि वेदा अॅग्री फर्टिलायझर्सचे डीलर तिरुपती रेड्डी यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. फर्टिलायझर्स ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांना बोलवलं होतं आणि या कार्यक्रमाला सुमारे ५६ खत विक्रेते उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की, या पार्टीत डान्स करण्यासाठी काही तरुणींनाही बोलवलं होतं.
पोलिसांनी अचानक रिसॉर्टवर छापा टाकला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. प्राथमिक तपासात खत कंपनीने त्यांच्या डीलर्सना खूश करण्यासाठी आणि बक्षीस देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली होती. हे रिसॉर्ट व्यावसायिक के. चंदर रेड्डी यांचे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून परदेशी बनावटीची दारू देखील जप्त केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांवर 'नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पार्टी आयोजित करणारे मुख्य आयोजक आणि या ड्रग्जच्या पुरवठ्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे हैदराबादमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.