बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिला गंभीर; गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने अतिरक्तस्राव; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:50 IST2025-03-23T13:48:11+5:302025-03-23T13:50:51+5:30
तपासणीत गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्याचे स्पष्ट

बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिला गंभीर; गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने अतिरक्तस्राव; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, दिघी: बोगस डॉक्टरमुळे महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने अतिरक्तस्राव होऊन तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नारायणकर यांनी दिघी सागरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडगाव येथील एक महिला त्याच गावात असलेल्या शंकर कुंभार या व्यक्तीच्या दवाखान्यात गर्भपातासाठी गेली होती. त्यावेळी कुंभार याने वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफी न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने काही वेळाने महिलेची प्रकृती खालावली. त्यामुळे नातेवाइकांनी तिला तातडीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीत गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्या होत्या, असे स्पष्ट झाले.
कारवाईची मागणी
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव येथील घडलेल्या या घटनेमुळे समोर आला आहे. त्यामुळे अशा बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शंकर कुंभार याने ‘सीएमएसईडी’ हा वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोर्स केला आहे. यामुळे काही औषधे देण्याची परवानगी आहे. मात्र, गर्भपाताच्या गोळ्या देणे, आपल्या नावासमोर डॉक्टर पदवी लिहिण्याची परवानगी नाही. गर्भधारणेबाबत काही समस्यांसाठी शासकीय रुग्णालयात किंवा स्त्री रोगतज्ज्ञांकडे उपचार करावेत.
-संतोष नारायणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी