बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:08 IST2025-09-18T13:07:42+5:302025-09-18T13:08:10+5:30
पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा भुवनेश्वर येथे शुभमित्रासोबत अखेरचं दीपकला पाहिले होते असं पुढे आले

बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
भुवनेश्वर - शहरातील वाहतूक विभागातील एका महिला कॉन्स्टेबलच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य पोलिसांनी उलगडले आहे. ६ सप्टेंबरपासून महिला कॉन्स्टेबल शुभमित्रा साहू बेपत्ता होती. पोलिसांनी केलेल्या तपासात शुभमित्राची हत्या झाली असून तिचा पती दीपक कुमार राऊतने ही हत्या केल्याचं समोर आले. दीपक हादेखील पोलीस शिपाई आहे. हत्येनंतर दीपकने शुभमित्राचा मृतदेह त्याच्या कारमध्ये लपवला होता. त्यानंतर रोजप्रमाणे तो कामाला गेला. संधी मिळताच त्याने १७० किमी अंतरावर निर्जन स्थळी जंगलात शुभमित्राचा मृतदेह दफन केला होता.
शुभमित्राच्या गायब झाल्यानंतर तो दुखी असल्याचा दिखावा करत होता. तिचे कुटुंब आणि पोलिसांच्या मदतीने दीपक तिला शोधण्याचं नाटकही करत होता. शुभमित्रा सुरक्षित परत यावी यासाठी त्याने मंदिरात पूजाही केली. पिचुकली येथील रहिवासी असलेली शुभमित्रा ६ सप्टेंबरला तिच्या ड्युटीवर गेली होती. परंतु संध्याकाळी ७ वाजता ती घराकडे निघाली परंतु घरीच पोहचली नाही. ती घरी न परतल्याने कुटुंबाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस शुभमित्राचा शोध घेत राहिली परंतु हाती काहीच लागले नाही.
त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा भुवनेश्वर येथे शुभमित्रासोबत अखेरचं दीपकला पाहिले होते असं पुढे आले. त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, दीपकवर आमचा संशय तेव्हा वाढला, जेव्हा आम्हाला मागील वर्षी दीपक आणि शुभमित्राने कोर्ट मॅरेज केल्याचे तपासात उघड झाले. याबाबत दोघांच्याही कुटुंबाला माहिती नव्हती. दोघांनी लग्न केले होते परंतु एकत्र राहत नव्हते. त्यामुळे या दोघांच्या नात्यातील गूढ आणखी वाढले. ६ सप्टेंबरला ती बेपत्ता झाली त्याबाबत दीपकची चौकशी केली तेव्हा त्या दोघांचे नाते ठीक सुरू होते असा दावा त्याने केला. शुभमित्रा तिच्या आई वडिलांशी भांडून घर सोडून गेली असेल असं सांगत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मोबाईलमधून सुगावा सापडला...
पोलीस तपासात शुभमित्राचा फोन अनलॉक करून तिचे व्हॉट्सअप चॅट पाहिले त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. दीपक आणि शुभमित्रा यांच्यात आर्थिक वाद सुरू होता. शुभमित्राने दीपककडून १० लाख रूपये उधार घेतले होते. दोघांमध्ये या गोष्टीवरून तणाव सुरू होता. शुभमित्रा तणावात होती, तिने मथुरा, वाराणसी अथवा एखाद्या आध्यात्मिक स्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसांनी दीपकची पॉलीग्राफ चाचणी केली त्यात त्याची उत्तरे दिशाभूल करणारी असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
दीपकने सांगितले सत्य
चौकशीत दीपकने कबूल केले की, ६ सप्टेंबरला शुभमित्राला होंडा सिटी कारने तिला घेऊन गेलो, दुपारी २- ३ च्या दरम्यान तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत लपवून दिवसभर काम करत होतो. दुसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात दफन केला. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जात शुभमित्राचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या गुन्ह्यात आरोपी दीपक राऊतला अटक करण्यात आली.