जामनगरमध्ये ६ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात ३० वर्षीय रवी धीरजलाल मरकाना या तरुणाचा मृत्यू झाला. पण आता प्रकरणाता आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवीचा अपघातात मृत्यू झाला नसून त्याची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी रवीची पत्नी रिंकल आणि तिचा बॉयफ्रेंड अक्षय डांगरिया यांना अटक केली. चौकशीत असं आढळून आलं की, ते गेल्या एक वर्षापासून रवीला मारण्याचा प्रयत्न करत होते. रवीच्या वडिलांनी रिंकलकडे याची विचारपूस केली तेव्हा ती रडून गेली. पोलिसांना रिंकलचा संशय आला अन् या घटनेचा पर्दाफाश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ६ एप्रिल रोजी संध्याकाळी रवी त्याच्या बुलेटने कालावडहून जामनगरला परतत होता. पण त्याला माहित नव्हतं की त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड त्याच्या मृत्यूचा कट रचत आहेत. रवीची पत्नी रिंकलने बॉयफ्रेंड अक्षय डांगरियाला त्याचं लोकेशन दिलं आणि अक्षयने कंपास जीपने त्याचा पाठलाग केला आणि रवीच्या बुलेटला जोरदार धडक दिली. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचं उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकल आणि अक्षय यांचं अफेअर होतं, ज्यामुळे घरात वारंवार भांडणं होत असत. अखेर या भांडणांनी धोकादायक वळण घेतलं आणि पतीचा मृत्यू झाला. पोलीस तपासात असं दिसून आलं की, अक्षयने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि रिंकल देखील तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा विचार करत होती.
रवीचे काका परेश मारकाना म्हणाले की, सुरुवातीला हा अपघात वाटत होता पण चौकशी केल्यावर ती हत्या असल्याचं उघड झालं. कुटुंबाने न्यायाची मागणी केली आणि विवाहबाह्य संबंधांमुळे हे घडल्याचं म्हटलं आहे. ज्याची पूर्वकल्पना होती, पण ठोस पुरावा नव्हता. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. रवीचं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे.