घर खरेदी करण्यासाठी २ लाखात केला पोटच्या मुलाचा सौदा; महिलेची हैराण करणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:36 IST2025-02-26T12:35:31+5:302025-02-26T12:36:24+5:30
आरोपी महिला मागील अनेक वर्षापासून बाल तस्करीचं काम करते. मात्र फेब्रुवारीत दिल्ली रेल्वे स्टेशनवर महिलेला २ मुलांसह अटक करण्यात आली होती.

घर खरेदी करण्यासाठी २ लाखात केला पोटच्या मुलाचा सौदा; महिलेची हैराण करणारी कहाणी
नवी दिल्ली - एक आई आपल्या मुलांसाठी कुठलीही मर्यादा ओलांडायला तयार असते, मुलांच्या आनंदासाठी आईची काहीही करण्याची तयारी असते. परंतु दिल्लीत एका अशा आईला अटक करण्यात आली आहे जिनं एक घर खरेदी करण्यासाठी स्वत:च्या १५ महिन्याच्या बाळाला २ लाख रूपयात विकायला तयार झाली. बाल तस्करीच्या या प्रकाराने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आरोपी महिलेने याआधी पहिल्या मुलाला ९० हजारात विकले, त्यानंतर छोट्या बाळाला विकण्यासाठी २ लाखांची किंमत ठेवली. इतकेच नाही तर अद्याप जन्माला न आलेल्या बाळाचाही सौदा आईने केला होता.
काय आहे प्रकरण?
या महिन्याच्या सुरुवातीला बाल तस्करीत पोलिसांनी एका महिलेला अटक केली. या महिलेने ना इतर मुलांना विकले तर स्वत:च्या मुलांचीही विक्री केली. रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा म्हणाले की, जेव्हा बाल तस्करीत पोलिसांनी महिलेला अटक केली. त्यानंतर चौकशीत तिने हा खुलासा केला. दिल्ली पोलिसांनी १० फेब्रुवारीला बाल तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. त्यात ४ जणांच्या तावडीतून २ लहान मुलांची सुटका करण्यात आली. त्यात एका महिलेलाही अटक करण्यात आले. आर्थिक तंगीतून ही महिला बाळांची विक्री करायची. १५ महिन्याच्या बाळालाही तिने २ लाखांसाठी विकले. गर्भवती असणाऱ्या या महिलेने पोटात वाढत असलेल्या बाळाचाही सौदा केला.
आरोपी महिला मागील अनेक वर्षापासून बाल तस्करीचं काम करते. मात्र फेब्रुवारीत दिल्ली रेल्वे स्टेशनवर महिलेला २ मुलांसह अटक करण्यात आली होती. चौकशीत या महिलेचं १७ वर्षापूर्वी लग्न झाले होते, तिला २ मुले होती. ७ वर्षांनी पतीने तिला सोडून दिले त्यानंतर तिने दुसरं लग्न केले. दुसऱ्या लग्नातून तिला आणखी २ मुले झाली. ज्यातील एक ६ वर्षाचा आणि एक १५ महिन्याचा होता. २ वर्षापूर्वी फरिदाबादमधील एका महिलेच्या ती संपर्कात आली जिने स्वत:ला डॉक्टर असल्याचं सांगितले. त्यांच्याकडे मुल नव्हते, तिला एक बाळ दत्तक घ्यायचे होते तेव्हा आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या आरोपी महिलेने पहिल्या मुलाला ९० हजारात तिला विकले.
दरम्यान, महिलेने तिच्या लहान बाळाला २ ते अडीच लाखात विकण्याचं प्लॅनिंग केले जेणेकरून तिला फरिदाबाद इथं छोटेसे घर खरेदी करता येईल. आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तिने पोटातील बाळही विकण्याचं ठरवल्याचं पोलिसांना चौकशीत कळालं. सध्या पोलीस या महिलेची आणखी चौकशी करत आहेत.