उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. निकाह होऊन अवघे २० दिवस उलटले नाहीत, तोच एका नवविवाहितेवर तिच्याच सख्ख्या दिराने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, या कृत्याची वाच्यता केल्यास पतीने आत्महत्या करण्याची धमकी देत पत्नीचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. अखेर सासरच्या छळाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा निकाह ११ डिसेंबर रोजी बारादरी परिसरातील एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर ती सुखात संसार करण्याची स्वप्ने पाहत असतानाच १ जानेवारी रोजी तिच्यावर आभाळ कोसळले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून नराधम दिराने घरात शिरून दरवाजा कडी लावून घेतली आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला, मात्र आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले.
पतीची साथ नाहीच, उलट मिळाली धमकी!
या भयानक प्रकारानंतर पीडिता पूर्णपणे कोलमडून गेली होती. आपला पती आपल्याला न्याय देईल या आशेने तिने पती घरी आल्यावर रडत रडत सर्व हकीकत सांगितली. मात्र, पतीने साथ देण्याऐवजी तिलाच धमकावले. "जर तू हे कोणाला सांगितलंस किंवा पोलिसांत तक्रार केलीस, तर मी आत्महत्या करेन," अशी धमकी पतीने दिली. या भावनिक ब्लॅकमेलिंगमुळे पीडिता काही दिवस गप्प राहिली.
सासू आणि पतीने मिळून केली मारहाण
पीडितेने जेव्हा पुन्हा एकदा न्यायासाठी पोलिसांत जाण्याचा निर्धार केला, तेव्हा पती, दीर आणि सासू या तिघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. "जर तोंड उघडलं तर परिणाम वाईट होतील," असा इशारा तिला देण्यात आला. सततचा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळे अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
पोलिसांची कारवाई
पीडितेच्या तक्रारीवरून बारादरी पोलिसांनी पती, दीर आणि सासू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस स्टेशन प्रभारी धनंजय पांडे यांनी सांगितले आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने पीडिता सुरुवातीला गप्प होती, मात्र आता तिला कडक न्याय हवा आहे.