माणसाला गरिबी मारत नाही, पण डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आणि लोकांमुळे होणारी मानहानी त्याला मरण्यास भाग पाडते, याचीच एक भीषण प्रचिती उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे. आपल्या पत्नीने घेतलेले लाखोंचे कर्ज फेडता-फेडता जेरीस आलेल्या एका ४५ वर्षीय टाईल्स कारागिराने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बाबूराम निषाद असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव असून, या घटनेने चकेरी कॅंट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
चकेरी कॅंटमधील मॅकूपुरवा येथे राहणारे बाबूराम निषाद हे टाईल्स बसवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी दुपारी बाबूराम नेहमीप्रमाणे कामावर गेले नाहीत. कामाच्या ठिकाणाहून वारंवार फोन आल्यानंतर त्यांचा पुतण्या रवी निषाद घरी पोहोचला. घराचा दरवाजा उघडाच होता, मात्र आत जाताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. खालच्या खोलीत पंख्याला साडीच्या साहाय्याने बाबूराम यांचा मृतदेह लटकलेला होता.
पत्नीने केले होते लाखोंचे कर्ज
बाबूराम यांची पत्नी अनिता ही गेल्या तीन वर्षांपासून आपल्या माहेरी चकेरीतील घाऊखेडा येथे राहत होती. या दोघांना अपत्य नव्हते. पत्नीने हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून अनेक संस्था आणि गल्लीतील लोकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज इतके मोठे होते की, बाबूराम दिवसरात्र मेहनत करूनही ते कमी होत नव्हते.
वसुलीवाल्यांच्या तगाद्याला कंटाळले
पत्नी माहेरी राहत असली तरी, कर्ज देणारे लोक बाबूराम यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. "बायकोने घेतलेले पैसे तूच द्यायचे," असा दबाव त्यांच्यावर सतत टाकला जात होता. आपली सर्व कमाई या कर्जाचे हप्ते भरण्यातच जात असल्याने बाबूराम यांचा खिसा रिकामा झाला होता. घरात खाण्यापिण्याचे हाल आणि वरून वसुलीवाल्यांचा मानसिक त्रास यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच चकेरी कॅंट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. "प्रथमदर्शनी हे प्रकरण कर्जाच्या विळख्यातून झालेल्या आत्महत्येचे दिसत आहे. मात्र, आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत," अशी माहिती ठाणे प्रभारी अरविंद राय यांनी दिली.
Web Summary : Kanpur tile worker Baburam, 45, burdened by his wife's debt, committed suicide. He was harassed by creditors, struggling with poverty and immense stress. Police are investigating.
Web Summary : कानपुर में पत्नी के कर्ज से डूबे टाइल्स कारीगर बाबूराम (45) ने आत्महत्या की। कर्जदाताओं से तंग आकर, गरीबी और तनाव से जूझ रहे थे। पुलिस जांच कर रही है।