पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:48 IST2025-08-23T19:46:34+5:302025-08-23T19:48:00+5:30
जन्माष्टमीच्या रात्री शिवम आणि निशा यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात निशाने तिच्या साडीने पतीचा गळा दाबला

पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. वैवाहिक वाद आणि दारूचं व्यसन यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. पत्नीने पतीला साडीच्या पदराने गळा दाबून जीव घेतला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाल्यानंतर मृत पतीच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून जेलमध्ये पाठवले आहे.
माहितीनुसार, कटरा बाजारातील पहाडापूर येथील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या २५ वर्षीय शिवम शुक्लाच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली. शिवमची हत्या त्याची पत्नी निशा शुक्लानेही केली असल्याचं पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी वापरण्यात आलेली साडी पोलिसांनी जप्त केली. पती-पत्नी यांच्यात दिर्घकाळ वाद सुरू होता. १६ ऑगस्टच्या रात्री शिवम गावात जन्माष्टमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. रात्री उशिरा नशेच्या अवस्थेत तो घरी परतला. त्यानंतर घरात पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून शिवमची हत्या झाली असं पोलिसांनी सांगितले.
जन्माष्टमीच्या रात्री शिवम आणि निशा यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात निशाने तिच्या साडीने पतीचा गळा दाबला. तिने साडीचा पदर शिवमच्या गळ्याभोवती इतका आवळला की त्याचा श्वास थांबेपर्यंत सोडले नाही. पोलिसांनी निशाची कॉल डिटेल्स तपासले त्यात ती अन्य कुठल्याही व्यक्तीशी बोलत नसल्याचे समोर आले. चौकशीत निशाने तिचा गुन्हा कबूल केला असून शिवम रोज नशेत येऊन घरात मारहाण करायचा, वाद घालत होता. जन्माष्टमीच्या रात्री तेच घडले, परंतु यावेळी निशाने सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, हत्येच्या २ दिवस आधीच शिवमने त्याची आई ममता शुक्लाला सांगितले होते, मी जिवंत राहावं हे निशाला बघायचे नाही. एक दिवस ती मला मारून टाकेल. आम्ही मुलाला त्यावेळी समजून शांत केले, जर आम्हाला थोडाही अंदाज असता की शिवमचे बोलणे खरे होईल तर आम्ही निशाला तिच्या माहेरी पाठवले असते. कमीत कमी माझ्या मुलाचा जीव वाचला असता असं त्याच्या आई वडिलांनी सांगितले.