पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:15 IST2025-09-13T16:14:37+5:302025-09-13T16:15:31+5:30
कॅप्टन रूपसिंह स्टेडियमजवळ अरविंद परिहार नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी नंदिनी परिहार हिची गोळ्या झाडून हत्या केली अन्...

पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..."
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कॅप्टन रूपसिंह स्टेडियमजवळ अरविंद परिहार नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी नंदिनी परिहार हिची गोळ्या झाडून हत्या केली. अत्यंत क्रूरपणे त्याने देशी कट्ट्यातून नंदिनीवर एकापाठोपाठ ५ गोळ्या झाडल्या. यापैकी २ गोळ्या तिच्या डोक्यात घुसल्या, तर ३ गोळ्या चेहऱ्यासह शरीराच्या इतर भागांवर लागल्या.
या घटनेनंतर आरोपी अरविंद त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून राहिला, तर नंदिनी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अरविंदने पोलिसांवरही कट्टा रोखला. एवढेच नव्हे, तर त्याने स्वतःच्या डोक्यालाही बंदूक लावली. या स्थितीमुळे पोलिसांचाही गोंधळ झाला. अखेर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर दुसऱ्या बाजूने येऊन पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. जखमी नंदिनीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
फेसबुक लाईव्हवर केला धक्कादायक खुलासा
नंदिनीला गोळ्या मारल्यानंतर लगेचच अरविंदने फेसबुक लाईव्हवर येऊन एक धक्कादायक खुलासा केला. त्याने म्हटले, "ही माझी पत्नी आहे. हिच्यासोबत बॉयफ्रेंड कल्लू आणि अंकुश पाठक होते, जे घटनास्थळावरून पळून गेले. ही सहा महिन्यांपूर्वीही पळून गेली होती. हे दोघे मिळून मला ब्लॅकमेल करत होते. तिने माझ्या तीन रुग्णवाहिका तिच्या नावावर करून घेतल्या आहेत आणि आता घराची मागणी करत आहे. माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाहीये."
अरविंदच्या आरोपानुसार, नंदिनीने पैसे उकळण्यासाठी अंकुश पाठक आणि कल्लू यांच्या सांगण्यावरून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
नंदिनीची गुन्हेगारी कुंडली
पोलिसांच्या तपासात नंदिनीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. नंदिनीचे पहिले लग्न दतिया येथील गोटीराम केबट याच्याशी झाले होते. लग्नानंतर पतीला सोडून ती दतियामधीलच निमलेश जैनसोबत राहत होती. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर तिने २०१७ मध्ये आपल्या प्रियकरासोबत मिळून निमलेशची हत्या केली होती. या प्रकरणात नंदिनीने साडेचार वर्षांचा कारावास भोगला. तुरुंगातून बाहेर आल्यावर ती छोटू आणि फिरोज खानसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली.
२०२२-२३ मध्ये तिची ओळख अरविंद परिहारसोबत झाली. अरविंद आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण दोघांनीही आपल्या कुटुंबाला सोडून आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि ग्वाल्हेरमध्ये पती-पत्नी म्हणून राहू लागले. तीन वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाले. यानंतर नंदिनीने अरविंदवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ३-४ गुन्हे दाखल केले.
गेल्या वर्षी नंदिनीने अरविंदने तिला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी अरविंदवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. परंतु, नंतर नंदिनीने कोर्टात आपला जबाब बदलल्यामुळे अरविंदला जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतरही दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यान, नंदिनी अरविंदच्या मालमत्तेवर हक्क सांगत होती. या वादातूनच हा गुन्हा घडला.