Wife killed by her Husband Delhi Crime: पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पतीने क्रूरतेच टोक गाठलं. आधी पत्नीला बेशुद्धीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर सलग पाच दिवस तिला थोडं थोडं कीटकनाशक पाजलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह दफनभूमीमध्ये पुरल्यानंतर त्याने पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा बनाव रचला, पण एका गोष्टीमुळे तो अडकलाच. पत्नीच्या हत्येचा सगळा घटनाक्रम त्याने सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. दृश्यम चित्रपटाच्या कथेसारखीच त्याने पत्नीची हत्या केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीसह पोलिसांनी या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या इतर दोघांनाही अटक केली आहे.
शबाब अली (वय ४७) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो रंगकाम करण्याचे काम करतो. तो उत्तर प्रदेशातील अमरोहाचा आहे. पत्नी फातिमाचे (वय ३०) विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याच्या मनात संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीची हत्या केली.
आधी गोळ्या, नंतर कीटकनाशक... पत्नीची हत्या कशी केली?
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अंकित चौहान यांनी या हत्येचा सगळा घटनाक्रम सांगितला. आरोपीची पत्नी फातिमा ही मेहरौलीला राहत होती. तर आरोपी दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी या ठिकाणी कामावर होता.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असावेत, असा संशय त्याला होता. याच संशयातून त्याने तिची हत्या करण्याचा कट रचला. पोलिसांनी प्राथमिक संशयित म्हणून पती शबाब याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. पण, त्याने असेही केले नसल्याचे सांगितले.
पण, त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने सगळा घटनाक्रम सांगितला. फातिमा मेहरौलीला राहत होती. आरोपी दिल्लीतून मेहरौलीला गेला. तिला घेऊन फतेहपूर बेरीला घेऊन आला. तिथे त्याने तिला बेशुद्ध होण्याच्या गोळ्यात पाण्यातून दिल्या. नंतर त्याने तिला सलग पाच दिवस थोडं थोडं कीटकनाशक पाजले. ३१ जुलैपर्यंत फातिमा फतेहपूर बेरी येथेच राहायला होती.
गावी घेऊन गेला आणि मृतदेह पुरूनच परत आला
फातिमाची कीटकनाशकामुळे प्रकृती बिघडली. तो तिला एका कपांऊडरकडे घेऊन गेला. त्यानंतर तो फातिमासह परत मेहरौलीला आला. तिथेच फातिमाचा १ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी आरोपीने तिचा मृतदेह शाहरूख आणि तनवीर या त्याच्या मित्रांच्या मदतीने दफनभूमिमध्ये नेऊन पुरला. त्यानंतर तो परत अमरोहाला गेला आणि फातिमाच्या मोबाईलवरून स्वतःलाच एक मेसेज पाठवला.
मी एका व्यक्तीसोबत पळून जात आहे आणि त्याच्यासोबत लग्न करणार आहे, असा मेसेज आरोपीने फातिमाच्या मोबाईलवरून स्वतःला पाठवला.
आरोपी कसा पकडला गेला?
दरम्यान, फातिमाच्या हत्येचे प्रकरणाची कुठेही वाच्यता झाली नाही. पण, १० ऑगस्ट रोजी तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने मेहरौली पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तिचे अपहरण केले गेले असावे, असे पोलिसांना वाटले आणि त्यांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सगळ्यात आधी सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतले. एका फुटेजमध्ये फातिमा तिचा पती आणि त्याच्या दोन मित्रांसोबत दिसली. त्या फुटेजमध्ये फातिमा बेशुद्धावस्थेत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली. तिथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
फातिमाचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला
हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मेहरौलीमधील स्मशानभूमिमध्ये पुरलेला फातिमाचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तिच्या हत्येच्या ११ दिवसांनी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी फातिमाचा मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे. आरोपीने हत्येचे पुरावे लपवण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे एका कालव्यात फेकले होते. तर मृतदेह पुरून टाकला होता, असेही तपासातून समोर आले.