पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा बनाव; खिशात शक्तीवर्धक गोळ्यांची ८ पाकिटे ठेवली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:36 IST2025-01-23T12:36:11+5:302025-01-23T12:36:42+5:30
पतीच्या मृत्यूवर शबाना धायमोकलून रडली जेणेकरून पोलीस आणि कुटुंबाला संशय येऊ नये.

पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा बनाव; खिशात शक्तीवर्धक गोळ्यांची ८ पाकिटे ठेवली, मग...
कानपूर - शहरात एका महिलेने केलेला कांड उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर औषधाच्या ओव्हरडोसमुळे पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. महिलेने पतीच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूलची ८ पाकिटे ठेवली. या व्यक्तीचा मृत्यू कदाचित कॅप्सूलच्या ओव्हरडोसमुळे झाला असावा असा पोलिसांनी अंदाज लावला आणि पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवून दफन केला. परंतु दुसऱ्या दिवशी पोस्टमोर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना धक्का बसला कारण त्यात मृत्यूचं कारण वेगळेच होते.
ही घटना कानपूरची आहे. याठिकाणी आबिद अली त्याच्या पत्नी आणि मुलासह राहत होता. १९ जानेवारीला आबिदच्या पत्नीने पोलिसांना फोन करून तिच्या पतीचा शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं कळवलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली तेव्हा पतीच्या पॅन्टच्या खिशातून शक्तीवर्धक गोळ्यांचे रॅपर मिळाले. शरीरावर कुठल्याही प्रकारे संशयास्पद खूणा नव्हत्या. त्यामुळे कदाचित मृतकाची पत्नी शबाना खरं बोलतंय यावर पोलिसांचा विश्वास बसला.
पतीच्या मृत्यूवर शबाना धायमोकलून रडली जेणेकरून पोलीस आणि कुटुंबाला संशय येऊ नये. त्यातच पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर नातेवाईकांनी आबिदवर अंत्यक्रिया उरकली. मात्र दुसऱ्या दिवशी पोस्टमोर्टम रिपोर्ट आला तेव्हा शबानाची पोलखोल झाली कारण पोस्टमोर्टममध्ये गळा दाबून हत्या करण्याची पुष्टी होती. औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा बनाव उघड पडला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा शबानाचा भाऊ सलीमनं आबिदची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली. त्यात बहिणीसोबत आणखी कुणी सहभागी असावा असं त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी शबानाला खाकीचा धाक दाखवत चौकशी केली. तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा ती रोज रात्री रेहान नावाच्या युवकाशी बोलायची हे समोर आले. पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. शबाना आणि रेहानची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. आबिद घरी नसताना रेहान अनेकदा शबानाला भेटायला यायचा. त्यात दोघांचे संबंध बनले. आबिदला जेव्हा संशय आला तेव्हा त्याने विरोध केला तेव्हापासून घरात भांडणे सुरू होती. या वादाला कंटाळून शबादाने आबिदचा काटा काढायचा ठरवलं. शबानाने रेहानला त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी केले आणि रेहानने त्याचा मित्र विकासलाही सोबत घेतले. घटनेच्या रात्री आबिद झोपला असताना शबानाने हळूच रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावले आणि तिघांनी मिळून आबिदची गळा दाबून हत्या केली.