पत्नीने विट, दगडाने ठेचून केली पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 16:39 IST2021-06-17T16:38:46+5:302021-06-17T16:39:25+5:30
Crime News: विट, दगडाने ठेचून महिलेने केली घरधन्याची हत्या

पत्नीने विट, दगडाने ठेचून केली पतीची हत्या
धनज बु. : येथून जवळच असलेल्या व धनज पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणवाडी येथे एका महिलेने घरगुती वादातून स्वत:च्याच घरधन्याची (पती) विट व दगडाने ठेचून हत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
मृतकाची मुलगी शितल प्रविण धवणे (वाढोणा, सिद्धनाथपूर, जि. अमरावती) हिने धनज पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ती माहेरी हिंगणवाडी येथे दोन दिवसांपुर्वी आली होती. मृतक संतोष संभाजी कांबळे हे त्यांचे वडिल संभाजी कांबळे व आई रेखा कांबळे यांच्याशी घरकुलाच्या कारणावरून नेहमी वाद घालायचे. माझी आई सुनिता कांबळे हिलादेखिल मारहाण करायचे. असाच प्रकार १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडला. दारूच्या नशेत वडील संतोष कांबळे यांनी आजोबा संभाजी कांबळे यांच्याशी वाद घातला. आईने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी राग अनावर झाल्याने आई सुनीता हिने वडील संतोष कांबळे यांच्या डोक्यावर विट मारून गंभीर जखमी केले. तसेच गोट्याने डोक्याला ठेचले. गंभीर अवस्थेत त्यांना उपचाराकरिता नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ जूनच्या रात्रीच आरोपी संगीता कांबळेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के, बीट जमादार रामेश्वर रामचवरे, गजानन वानखेडे करित आहेत.