अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
By प्रदीप भाकरे | Updated: April 30, 2025 21:00 IST2025-04-30T21:00:10+5:302025-04-30T21:00:58+5:30
मावसभावाला दिली सुपारी, पत्नीसह चौघांना अटक

अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
प्रदीप भाकरे, अमरावती: पत्नीसह दुचाकीने जात असलेल्या पतीला अडवून हॉकी स्टिकने मारहाण करीत त्यांच्याजवळील ९५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. ही घटना २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडला यश आले आहे. अवघ्या १२०० रुपयांत पत्नीनेच पतीला बेदम मारहाण करून त्याला अद्दल घडविण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. मावसभावाच्या मदतीने तिने पतीला लुटल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पथकाने फिर्यादीच्या पत्नीसह तिचा मावसभाऊ व त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक केली.
ममता अजय राठी (२७, रा. येरला, मोर्शी), चेतन जय टांक (१९), करण संतोषराव मुंदाने (१९,दोघेही रा. आर्वी, वर्धा) व स्मित संजय बोबडे (१९, रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. येरला येथील रहिवासी व्यापारी अजय संजय राठी (३१) हे २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पत्नीसह दुचाकीने अकोली रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जात होते. मार्गात तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ व बोटातील अंगठ्या असा ९५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून ते पळून गेले. पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील स्पेशल स्कॉडही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात या गुन्ह्यात चेतन टांक याच्यासह त्याचे साथीदार करण मुंदाने व स्मित बोबडे यांचा हात असल्याचे समोर आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत चेतन टांक याने आपण आपल्या मावस बहिणीच्या प्लाननुसार हा गुन्हा केल्याचे सांगितले.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, दरमहा १५ हजार रुपये
चेतन टांकच्या कबुलीनुसार, मावस बहीण ममता राठी हिचे अजय राठी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दरमहा १५ हजार रुपये देण्याच्या अटीवर तिने त्याच्यासोबत २०२४ मध्ये लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही दिवासांनंतर त्याने पैसे देणे बंद केले. त्याचा राग माझ्या मनात असून पती अजयकडून प्रॉपर्टीचा हिस्सा व महिन्याला १५ हजार रुपये पुन्हा सुरू करायचे आहेत. तसा तो देणार नाही. त्यासाठी तू तुझ्या ओळखीची दोन मुले शोध, असे तिने सांगितले. त्यानुसार मी माझे मित्र करण व स्मित बोबडे यांची ममता राठी हिच्यासोबत भेट घडवून दिली. ठरलेल्या प्लाननुसार आम्ही गुन्हा केला. त्या मोबदल्यात ममता राठी हिने आम्हाला पैसे दिले. त्याचवेळी याबाबत कुणाला काहीही सांगू नका, माझी ओळख दूरपर्यंत आहे, मी सर्व सांभाळून घेईन, असे तिने म्हटल्याचे चेतन टांकने चौकशीत सांगितले. आरोपींना पुढील कारवाईसाठी खोलापुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.