बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:05 IST2025-09-23T17:05:11+5:302025-09-23T17:05:43+5:30
Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार पाहून पोलिसांना बोलावलं अन् सारंच उघड झालं...

बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
Husband Wife Crime News: झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात घरगुती वादातून मोठा राडा झाला. मिहिजाम पोलिस स्टेशन परिसरातील पाईपलाईन परिसरात रविवारी ४० वर्षीय महावीर यादव यांची त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरातच चाकूने वार करून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
एसडीपीओ विकास कुमार यांनी सांगितले की, मृत महावीर यादव हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो अनेक वर्षांपासून मिहिजाममध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. रविवारी रात्री त्याची पत्नी काजल देवी हिने त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल फोनची मागणी केली. त्यातूनच वाद झाला. संतापलेल्या काजलने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि महावीरवर सपासप वार केले.
महावीरच्या छातीवर आणि शरीराच्या अनेक भागांवर खोल जखमा झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेला चाकू जप्त केला. आरोपी काजल देवी हिच्याविरुद्ध मिहिजाम पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आता या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार ही हत्या पैशांच्या आणि मोबाईल फोनच्या मागणीमुळे झाली आहे, परंतु त्यामागे इतर काही हेतू असू शकतात का याचाही तपास केला जात आहे. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की जोडप्यात अनेकदा भांडणे होत असत, परंतु रविवारी मात्र हा वाद फारच टोकाला पोहोचला.