Bengaluru Wife Arrested For Husband Murder: कर्नाटकातील बंगळुरुमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. महिन्याभरापूर्वी बंगळुरुतील एका निर्जण ठिकाणी एका माणसाचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि त्याची कार काही फूट अंतरावर उभी होती. त्याच्या शेजारी एक रिकामी विषाची बाटली पडली होती. तर त्याची अस्वस्थ पत्नी पतीच्या मृत्यूवर रडत होती आणि ओरडत होती, "तू हे का केलेस? तू मला का सोडून गेलास?". या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्याच्या पत्नीला एक साधा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर देताना पत्नी फसली आणि एका भयानक गुन्ह्याचा उलघडा झाला.
दक्षिण बंगळुरुतील कानवा धरणाजवळील निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होतं. त्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता आणि जवळच विषाची रिकामी बाटली होती. तर त्याची गाडी थोड्या अंतरावर उभी होती. घटनास्थळी त्याची पत्नी रडत होत. पण पोलिसांनी बारकाईने तपास केला तेव्हा एकेक करून सत्य बाहेर येऊ लागले. पोलिसांना समजलं की ही आत्महत्या नव्हती, तर कट रचून केलेली हत्या होती.
पत्नीचा आक्रोश पाहून सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्येची घटना वाटत होती. कारण घटनास्थळी सर्व काही तसेच दिसत होते - विष, रडणारी पत्नी, मृतदेह. पण नंतर पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रश्न लक्षात आले ज्यांकडे इतर कोणीही लक्ष दिलं नव्हतं. पोलीस निरीक्षक बीके प्रकाश आणि उपनिरीक्षक सहाना पाटील यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. जर या व्यक्तीचा मृत्यू विष पिऊन झाला असेल तर विषाच्या बाटलीचे झाकण कुठे आहे? बाटली जवळच ठेवली होती, पण तिचे झाकण कुठेही सापडले नाही. याशिवाय मृताच्या फक्त एका पायात चप्पल होती. दुसरा पाय मोकळा होता. जर कोणी आत्महत्या केली तर तो एकच चप्पल घालून का करेल असाही प्रश्न पोलिसांना पडला.
४५ वर्षीय लोकेश कुमारच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी चंद्रकला घटनास्थळी धावत पोहोचली आणि मोठ्याने रडू लागली. दुसऱ्याच दिवशी चंद्रकलाने पत्रकार परिषद बोलावली आणि तिथेही ती खूप रडली. पण त्यानंतर लगेचच कुटुंबाकडून एक आरोप करण्यात आला, ज्यामुळे प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली. लोकेशच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की चंद्रकलाचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. लोकेशला याची जाणीव झाली होती. पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरू केला. चन्नपटना सरकारी रुग्णालयाच्या अहवालात लोकेशचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे समोर आलं. पण डॉक्टरांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की विषाचा परिणाम लोकेशच्या छातीच्या भागावर जास्त होता. सहसा आत्महत्यांमध्ये विष थेट पोटात जाते.
यामुळे पोलिसांना खात्री पटली की लोकलशा जबरदस्तीने विष पाजले असावे. पोलिसांनी खात्री पटवण्यासाठी आणखी एकदा शवविच्छेद करुन घेतले आणि त्यातही विष जबरदस्तीने पाजले गेले असावे अशीच माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी धरणाजवळ राहणाऱ्या काही गावकऱ्यांकडून माहिती घेतली तेव्हा कोणीतरी सांगितले की २३ जूनच्या रात्री तिथे एक काळी कार दिसली होती. त्यानंतर पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा तिच काळ्या रंगाची कार दिसून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
पोलिसांकडून चंद्रकलाचे फोन कॉल डिटेल्स आणि लोकेशन रेकॉर्ड तपासण्यात आले. ती बंगळुरूच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या योगेश नावाच्या व्यक्तीशी सतत संपर्कात होती. लोकेशन डेटावरून घटनेच्या रात्री योगेश कानवा धरणाजवळ होता हे सुद्धा समोर आलं. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत लोकेशची हत्या केल्याची कबुली दिली. जेव्हा लोकेशला त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल कळले तेव्हा चंद्रकला आणि योगेशला भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी मिळून लोकेशला संपवण्याचा कट रचला.
२३ जून रोजी, लोकेश त्याच्या दुकानातून निघाला गेला तेव्हा चंद्रकलाने योगेशला फोन केला. योगेश आधीच तयार होता. आणखी तीन लोकांसह, तो आठवड्यापूर्वी खरेदी केलेल्या काळ्या कारमधून लोकेशच्या मागे गेला. कानवा धरणाजवळ संधी मिळताच त्यांनी लोकेशच्या गाडीला मागून धडक दिली. लोकेश गाडीतून खाली उतरताच त्याला जबरदस्तीने गाळ्या गाडीत बसवले आणि विष पाजण्यात आले. लोकेश मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा मृतदेह काही अंतरावर फेकण्यात आला आणि जवळच विषाची बाटली ठेवण्यात आली, जेणेकरून त्याने आत्महत्या केल्याचे वाटेल. मात्र आरोपी मृतदेहाजवळ विषाच्या बाटलीचे झाकण आणि दुसऱ्या पायातील चप्पल ठेवणे विसरले आणि या गुन्ह्याची उकल झाली.