पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:15 IST2025-10-30T17:09:38+5:302025-10-30T17:15:16+5:30
मला कुठल्याही प्रकारे नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण इमारतीला आग लावू शकतो अशी धमकी त्याने दिली होती.

पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
मुंबई - ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बोलावून पवईच्या स्टुडिओत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेतील मास्टरमाईंड रोहित आर्य याला पोलिसांनी अटक केली आहे. अचानक दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली. मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी अत्यंत खबरदारीने पोलिसांनी डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका करून आरोपीला तात्काळ अटक केली.
कोण आहे रोहित आर्य?
ज्या रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवले त्याच्याकडून एअरगन सापडली आहे. रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. मात्र त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्य याने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते अशी माहिती समोर येत आहे.
मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्यचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात तो म्हणाला की, मला आत्महत्या करायची नाही, मी दहशतवादी नाही. माझ्या काही मागण्या आहेत. त्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे. मी एकटा नाही. माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत. मला कुठल्याही प्रकारे नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण इमारतीला आग लावू शकतो अशी धमकी त्याने दिली होती.
काय आहे प्रकार?
पवईच्या आरए स्टुडिओमध्ये गुरुवारी ऑडिशन सुरू होते. त्यात १०० हून अधिक मुलांना ऑडिशनसाठी बोलावले होते. मात्र त्याआधीच स्टुडिओत पोहचलेल्या १७ मुले आणि काही नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. ओलीस ठेवलेल्या मुलांचे वय १५ वर्षाखालील होते. या घटनेची माहिती मिळतात पोलीस संपूर्ण यंत्रणेसह तिथे पोहचले. त्यांनी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितसोबत चर्चेचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही पोलीस शिताफीने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये पोहचले आणि आरोपी रोहितला तात्काळ अटक करण्यात आली.