कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By आशीष गावंडे | Updated: August 7, 2024 21:49 IST2024-08-07T21:20:29+5:302024-08-07T21:49:24+5:30
आराेपीविराेधात गुन्ह्याच्या कलमात वाढ; रक्ताचे नमुने पाठवले

कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीने दिली धडक; ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
अकोला - कावड यात्रा पाहताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ऋषिकेश मंगेश वानखडे या सहा वर्षीय चिमुकल्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी आराेपीविराेधात गुन्ह्याच्या कलममध्ये वाढ केली असून आराेपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती आहे.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ५ ऑगस्ट राेजी गांधीग्राम येथून कावडधारी शिवभक्त खांद्यावर कावड घेवून शहरात येत होते. हा उत्सव पाहण्यासाठी ऋषिकेश मंगेश वानखडे (६), अब्दुल उमेर अब्दुल करीम (७) दाेन्ही राहणार पुरपीडीत काॅलनी ही मुले त्यांच्या घराजवळ असलेल्या माेठ्या नाल्यावरील धाप्यावर बसलेले होते. यादरम्यान, अकोटफैल पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अब्दुल कलाम चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकी (ॲक्टिव्हा) स्वाराने दोन मुलांना जाेरदार धडक दिली.
या घटनेत ही दाेन्ही मुले गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी सर्वाेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले हाेते. त्यावेळी दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त मुलाने घटनास्थळावर दुचाकी साेडून पळ काढला. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी साेमवारी रात्री तुळशीदास उर्फ तरुण रघुनाथ पहारे (२२) याला अटक केली हाेती. दरम्यान, रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या सहा वर्षीय ऋषिकेश मंगेश वानखडे या चिमुकल्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी आराेपी तुळशीदास रघुनाथ पहारे याच्या विराेधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक गजानन राठाेड करीत आहेत.