टेनिसपटू राधिका यादव हिच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या अभिनेता इनामुल हकने पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'च्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा देण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर जवळपास एक तास लाईव्ह येत सोशल मीडिया युजर्सच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने वारंवार त्याच्या आईची शपथ घेत, राधिकासोबतच्या नात्यासंदर्भात भाष्य केले आणि म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या राधीकासोबत आपले कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचा आश्वासन देण्याचा जोरदार प्रयत्न केला.
२५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिची गेल्या गुरुवारी तिचे वडील दीपक यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दीपक यांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. मुलीची कमाई खाण्याच्या टोमण्यांना कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राधिका रील आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करत होती, म्हणून वडिलांनी तिची हत्या केली असावी, असे अंदाजही वर्तवले जात आहेत. यातच, युट्यूब आणि फेसबुकवर राधिका आणि इनामुल हकचा 'कारवां' हा म्युझिक अल्बम बघितल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी याला 'लव्ह जिहाद'चा अँगलही दिला आहे.
सोशल मीडियावरील 'लव्ह जिहाद'च्या चर्चेनंतर, इनामुल हकने व्यथीत होऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह येत आपले म्हणणे मांडले. दरम्यान त्याने अनेक वेळा आईची शपथ घेत, त्याचे राधिकासोबत कसलेही संबंध नव्हते, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, या प्रकरणावरून ज्या पद्धतीने हिंदू-मुस्लीम केले जात आहे, यामुळे झोपणे आणि खाणेही अवघड झाले आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीसंदर्भातही यावेळी भाष्य केले.
इनामुल हक म्हणाला, या प्रकरणाला काही लोक लव्ह जिहादचा अँगल देत आहेत आणि तिच्या वडिलांनी जे केले चांगलेच केले, असेही म्हणत आहेत. लोक राधिकासंदर्भातही कमेंट करत आहेत की, बरे झाले, तिच्या वडिलांचा अभिमान वाटतो. यामुळे मला अधिक त्रास होत आहे.
आई शपथ माझा काही संबंध नाही -इनामुल हक पुढे म्हणाला, "मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की, माझा राधिकाशी काहीही संबंध नव्हता. माझ्याही घरी आई आणि बहीण आहे. मुलगी, आई, बहीण प्रत्येकाच्याच आयुष्यात येणार आहेत. त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. ज्याचा काही संबंधच नाही, अशा गोष्टिंसंदर्भात लोक बोलत आहेत, ती या जगातून निघून गेली आहे. मी स्वतःला निष्पाप म्हणत नाही. ती निष्पाप होती. मी राधिकासंदर्भात घाणेरड्या कमेंट वाचत आहे, म्हणून लाईव्ह आलो आहे. लोकांच्या मनात धर्माबद्दल एवढा द्वेष आहे. लोक काहीही बोलत आहेत."