बसमधून उतरताना महिलेचे १.०५ लाखाचे मंगळसुत्र पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: April 2, 2023 13:12 IST2023-04-02T13:11:38+5:302023-04-02T13:12:01+5:30
ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंडारा रोडवरील पारडी बसस्टॉप येथे शनिवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली.

बसमधून उतरताना महिलेचे १.०५ लाखाचे मंगळसुत्र पळविले
नागपूर : पतीसोबत भंडारावरून नागपूरला आलेली महिला बसमधून खाली उतरत असताना तिच्या पर्समधील मंगळसुत्र आणि रोख १५०० असा एकुण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला.
ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंडारा रोडवरील पारडी बसस्टॉप येथे शनिवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. पिंकी रितेश तमाने (३०, आदर्शनगर दिघोरी उमरेड रोड) असे या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पतीसोबत बसने भंडावरून नागपूरला आल्या. पारडी बसस्टॉपवर त्या बसमधून खाली उतरत असताना बसमध्ये गर्दी होती.
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र आणि रोख १५०० असा एकुण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी ठाण्याचे उपनिरीक्षक क्रिष्णा वाघ यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.