दारुगोळ्याने भरलेले बॉक्स आणि हत्यारे आली कुठून? करनालमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:38 IST2022-05-05T14:37:56+5:302022-05-05T14:38:34+5:30
Terrorists Arrest in Karnal News: करनालमध्ये आज दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली. त्यामधून पाकिस्तानकडून भारतात अशांतता माजवण्यासाठी कशाप्रकारे दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दारुगोळ्याने भरलेले बॉक्स आणि हत्यारे आली कुठून? करनालमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर
नवी दिल्ली - करनालमध्ये आज दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली. त्यामधून पाकिस्तानकडून भारतात अशांतता माजवण्यासाठी कशाप्रकारे दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांना पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या खलिस्तान समर्थक बब्बर खालसा संघटनेच्या दहशतवाद्याकडून हत्यारे सापडल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच त्याने या नवख्या तरुणांकडे ड्रोनने हत्यारे पाठवली. तसेच हे कंसाइनमेंट कुठे पोहोचवायचे याबाबतचा पत्ता दिला.
करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी आहेत. या चौघांचेही वय हे २० ते २५ च्या दरम्यान आहे. या चौघांपैकी तिघेजण हे फिरोजपूर तर एक तरुण लुधियाना येथील आहे. तोच मुख्य आरोपी आहे. तुरुंगात असताना त्याची अन्य दहशतवाद्यांशी ओळख झाली होती.
हे चारही दहशतवादी खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह ऊर्फ रिंडा याच्याशी संबंधित होते. त्याने ड्रोनच्या माध्यमातून फिरोजपूर येथे हत्यारे पाठवली होती. हे दहशतवादी महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते. हा दारुगोळा ते तेलंगाणा येथे पाठवणार होते. तसेच जिथे सामान पोहोचवायचे होते तेथील पत्ता त्यांना पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. त्यांनी याआधी दोन ठिकाणी आयईडीचा पुरवठा केला होता.