नावाचं काय घेऊन बसलात? इकडे पुण्यात e चा a करून लाखो रुपये उडविलेत, जरा सांभाळून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:34 IST2023-07-25T13:34:15+5:302023-07-25T13:34:35+5:30
पैसे दिले तरी अजून ऑर्डर का येत नाहीय, या चिंतेत असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ईमेल आयडी पाहिला तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आहे.

नावाचं काय घेऊन बसलात? इकडे पुण्यात e चा a करून लाखो रुपये उडविलेत, जरा सांभाळून...
आजकाल स्मार्टफोनमध्ये सारखे डोके घालून राहिल्याने बधिर व्हायला झाले आहे. डोळे पाहतात एक, मेंदू समजतो एक अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. अनेकजण मेसेज न वाचताच त्यावर ओके करू लागले आहेत. अशातच पुण्यातील एका फ्रॉडने अनेकांच्या पायाखालची वाळू, झोप उडविली आहे.
पैसे दिले तरी अजून ऑर्डर का येत नाहीय, या चिंतेत असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ईमेल आयडी पाहिला तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आहे. एका कंपनीची ईमेलद्वारे २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
पुण्यातील एका अभियांत्रिकी पुरवठा फर्मने फ्रान्स स्थित फर्मला ऑर्डर दिली होती. त्या बदल्यात कंपनीने 24,000 युरो वळते केले होते. मात्र, अनेक दिवस झाले तरी ऑर्डर डिलिव्हर होईना यामुळे चिंतेत असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे.
फसवणूक करणार्याने यासाठी ई-मेल आयडीचे फक्त एक अक्षर बदलले होते. ही बाब फर्मचे उच्च अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात आली नाही. जानेवारी, फेब्रुवारीतील हा प्रकार आता उघड झाला आहे. फ्रान्सस्थित कंपनीने प्रो-फॉर्मा इनव्हॉइस पाठवून ऑर्डरची पुष्टी केली. त्यानंतर थोड्याच वेळात फर्मला एक ईमेल प्राप्त झाला. त्यात ते फ्रान्समधील नियमित बँक खाते आणि SWIFT कोडमध्ये ट्रान्झेक्शन करू शकत नाहीत असे म्हटले होते. त्याऐवजी त्याने नवीन बँक खात्याचे तपशील दिले आणि त्यात पैसे भरण्यास सांगितले.
आता कंपनीला ऑर्डर दिल्याचे फक्त त्या कंपनीला माहिती होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा विश्वास बसला. यामध्ये ईमेल आयडीतील स्पेलिंगमध्ये फक्त एका अक्षराचा फरक होता. यामुळे कंपनीच्याची लक्षात आले नाही व पैसे पाठविले गेले. यामध्ये ए च्या जागी ई करण्यात आले होते. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्यांनी मध्यस्थांची ट्रिक वापरली आहे. हॅकर्सने फर्मचे ईमेल तपशील चोरले आणि त्याच्या आधारे संपूर्ण सापळा रचला होता. पोलीस याचा तपास करत आहेत.