शिकायला पाठवलं अन् आयुष्य उद्ध्वस्त झालं! बंगालमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, मित्र सोडून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:11 IST2025-10-11T16:07:46+5:302025-10-11T16:11:13+5:30
पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

शिकायला पाठवलं अन् आयुष्य उद्ध्वस्त झालं! बंगालमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, मित्र सोडून पळाला
West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील पश्चिम वर्धमान जिल्ह्यात एका एमबीबीएस विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पुन्हा एकदा एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे शहरात खळबळ उडाली आहे तिला तिच्या कॉलेज कॅम्पसबाहेर ओढून नेण्यात आले आणि नंतर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी कॅम्पसमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे. भाजपनेही या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पीडित विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. ती पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १० ऑक्टोबर रोजी कॉलेज कॅम्पसबाहेर घडली, जेव्हा ती तिच्या मित्रासोबत जेवण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी काही नराधमांनी तिला पकडलं आणि तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री १० वाजता तिच्या मैत्रिणीने आम्हाला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. आम्ही जालेश्वर येथे राहतो आणि माझी मुलगी येथे शिकण्यासाठी आली होती. काल (घटनेच्या दिवशी) तिच्याच एका वर्गमित्राने तिला काहीतरी खाण्याच्या निमित्ताने बाहेर बोलावले. पण, तिथे इतर दोन-तीन पुरुष आल्यावर तो मित्र तिला सोडून पळून गेला. त्यानंतर त्या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना रात्री ८ ते ९ या वेळेत घडली. वसतिगृहापासून दूर ती खाण्यासाठी तिथे आली होती."
पीडितेच्या वडिलांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. "येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. इतकी गंभीर घटना घडली, तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये. इथे कसलीही व्यवस्था नाही, कोणाचाही प्रतिसाद नाही," असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. वडिलांनी शिक्षण संस्था आणि प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलीवर झालेल्या या अत्याचाराने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
"आम्हाला तिच्या मैत्रिणींचा फोन आला आणि आम्हाला घटनेची माहिती मिळाली. आम्ही आज सकाळी इथे आलो आणि पोलिस तक्रार दाखल केली. मी ऐकले होते की या कॉलेजचे शिक्षण उत्तम होते. म्हणूनच आम्ही आमच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी येथे पाठवले. माझ्या मुलीला न्याय हवा आहे कारण दुसऱ्या कोणत्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये," असेही पीडितेच्या वडिलांनी सांगितले.