बर्थ डे पार्टीला गेली अन् ३ महिन्याची प्रेग्नेंट झाली; मुंबईतील १७ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:28 IST2025-03-28T19:27:11+5:302025-03-28T19:28:00+5:30
पोलिसांनी पीडितेकडून तक्रार नोंदवून घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

बर्थ डे पार्टीला गेली अन् ३ महिन्याची प्रेग्नेंट झाली; मुंबईतील १७ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण
मुंबई - बर्थ डे साजरा करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीला धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. बर्थ डे पार्टीत एका अज्ञाताने तिचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झाले. जेव्हा वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलगी ३ महिन्याची गर्भवती असल्याचं कळलं तेव्हा हा प्रकार समोर आला. या प्रकरणी जे.जे मार्ग पोलीस ठाण्यात पॉस्को आणि इतर कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, कळवा येथे राहणारी पीडित युवतीला तिची मैत्रिण सुनीताने बर्थ डे पार्टीच्या तिच्या फोर्ट येथील घरी बोलावले होते. १५ डिसेंबर २०२४ रोजी ही घटना घडली. घरात बर्थ डे पार्टी सुरू होती तेव्हा एका अज्ञाताने जबरदस्तीने पीडितेला बाथरूममध्ये नेले आणि तिचं लैंगिक शोषण केले. घडलेला प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकी पीडितेला देण्यात आली. जर ही घटना समोर आली तर समाजात आपली बदनामी होईल या भीतीने पीडितेने हा प्रकार कुणालाच सांगितला नाही असं त्यांनी म्हटलं.
त्यानंतर अलीकडेच पीडित युवतीच्या पोटात दुखण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ती जे.जे हॉस्पिटलला वैद्यकीय तपासणीसाठी गेली. तपासणीवेळी ती साडे तीन महिन्याची गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आले. युवती अल्पवयीन असल्याने हॉस्पिटल प्रशासनाने सदर बाब जे.जे मार्ग पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेकडून तक्रार नोंदवून घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस पीडितेची मैत्रिण सुनीता हिची चौकशी करणार आहेत. त्याशिवाय जास्तीत जास्त माहिती जमा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हा गुन्हा फोर्ट परिसरात घडल्याने पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात येईल असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.