शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 20:11 IST2020-11-13T20:03:03+5:302020-11-13T20:11:09+5:30
Lost And Found : चोरीला गेलेले व हरवलेले 27 मोबाईल नागरीकांना केले परत, खडकपाडा पोलीसांची कारवाई

शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध
कल्याण - चोरीला गेलेले आणि हरवलेल्या अशा 27 महागडया मोबाईलचा शोध लावून खडकपाडा पोलिसांनी शुक्रवारी नागरिकांना परत केले. विशेष म्हणजे 2019 च्या पूरात हरवलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे.
चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसापासून मोबाईल स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या चो-या पाहता कल्याणचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्हयांच्या तपासकामी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी अनेक मोबाईल चोर आणि घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलचा तपास सुरु होता पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयांची उकल करताना 27 मोबाईल चोरटय़ांकडून हस्तगत केले होते. यामध्ये हरविलेले मोबाईल सुद्धा होते. शुक्रवारी उपायुक्त विवेक पानसरे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार यांच्या हस्ते 27 मोबाईल नागरीकांना सुपूर्द करण्यात आले. कर्नाटकाहून एक महागडा मोबाईल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे 2019 च्या पूरात कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरातील फुलेनगरमधील एका तरुणाचा मोबाईल हरविला होता. पुराच्या पाण्यात मोबाईल वाहून गेला होता. हा मोबाईल सुद्धा पोलिसांनी शोधून काढत तरुणाची बहिण ऐश्वर्या मोरे हिच्या स्वाधीन केला आहे. यापूढेही नागरीकांचे मोबाईल शोधून परत केले जातील असे पोलिसांनी सांगितले.