मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने क्राइम पेट्रोल या मालिकेचे तब्बल ५० भाग पाहून आपल्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने तिचे वडील, भाऊ आणि काकांच्या मदतीने प्रियकरला मारहाण केली, नंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचला आणि गुप्तांग देखील कापले. यानंतर त्यांनी या तरुणाचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, पोलिसांना हा मृतदेह सापडल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला.
आरोपी महिला ही उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचा मृत प्रियकर संजय हा देखील जालौनचा रहिवासी होता. दोघांचे अनेक वर्षांचे प्रेमसंबंध होते. परंतु, नंतर या महिलेने इंदूरमधील एका तरुणाशी लग्न केले. तथापि, लग्नानंतरही महिलेचे संजयशी प्रेमसंबंध सुरूच राहिले. दोघेही एकमेकांशी बोलत राहिले आणि एकमेकांना भेटत राहिले. परंतु दरम्यान, महिलेचे वडील मुन्ना लाल यादव आणि भाऊ रोहित, पुतण्या शुभम यांना महिलेची आणि संजयच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली.
संजय ऐकेना...
महिलेचे वडील, भाऊ आणि काका यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला संजयशी बोलण्यापासून रोखले. महिलेने आपल्या कुटुंबाचे म्हणणे ऐकले आणि संजयशी संबंध तोडले. परंतु संजय तिला भेटण्यासाठी सतत फोन करत राहिला. संजय महिलेला भेटण्यासाठी इंदूरला पोहोचला तेव्हा महिलेने संजयला तिच्या घरी बोलावले. महिलेने तिचा भाऊ, वडील आणि काकासह संजयला मारण्याची योजना आधीच आखली होती.
तो घरी आला अन्....
संजय महिलेच्या घरी आला तेव्हा महिलेचे वडील, भाऊ आणि काकांनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी त्याचा चेहरा दगडांनी ठेचला. एवढेच नाही तर तिघांनी संजयचे गुप्तांग कापले आणि त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, तिने संजयला भेटण्यास नकार दिला होता. परंतु, संजयने महिलेला धमकी दिली होती की, तो तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल.याच भीतीपोटी तिने संजयला ठार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने आधी क्राइम पेट्रोलचे ५० भाग पाहिले आणि नंतर वडील, भाऊ आणि काकासोबत मिळून संजयला मारण्याचा प्लान केला होता.