तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:58 IST2025-07-18T12:57:29+5:302025-07-18T12:58:38+5:30
तिसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी एक महिलेने बॉयफ्रेंडसोबत मिळून असं काही केलं की ती थेट तुरुंगात गेली.

तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
उत्तराखंडमधील हरिद्वारमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा जीव घेतला. तिसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी तिने हे भयंकर कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत व्यक्ती या महिलेचा दुसरा पती होता.
बागेत सापडला होता मृतदेह
प्रकरण पथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी ई-रिक्षा चालक प्रदीप (वय ४८, रा. अंबुवाला) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी रीना (वय ३६) आणि तिचा प्रियकर सलेख यांना अटक केली आहे. १४ जुलै रोजी किशनपूर गावातील एका आंब्याच्या बागेत प्रदीप यांचा मृतदेह आढळला होता. प्रदीपच्या पुतण्याने, मांगेरामने, पोलिसांत हत्येची तक्रार दाखल केली होती.
पहिल्या पतीचाही झाला होता मृत्यू, आता तिसऱ्या लग्नाचे मनसुबे!
एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी तातडीने पोलीस पथक तयार करून या हत्येचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी प्रदीपच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रदीपच्या पत्नीवर संशय घेतला. तपासणीत असं समोर आलं की, रीनाचा पहिला पती आजारपणामुळे मरण पावला होता. त्यानंतर १० वर्षांपूर्वी तिने प्रदीपसोबत दुसरं लग्न केलं. पण काही दिवसांतच तिचं त्याच गावातील सलेख नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं. रीनाला आता तिसरं लग्न करायचं होतं, पण पती प्रदीप तिच्या मार्गात अडथळा बनला होता.
असा आला पोलिसांना संशय अन् उघड झालं सत्य!
पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवसापासून सलेखचा मोबाईल नंबर बंद होता आणि तो गावातून फरार झाला होता. यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी रीनाला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, तिने आपलं प्रेमप्रकरण आणि कट रचून सलेखच्या मदतीने प्रदीपची हत्या केल्याचं कबूल केलं. रीनाच्या कबुलीजबाबवरून पोलिसांनी हत्येतील आरोपी सलेखला लक्सर रेल्वे स्थानकाजवळून अटक केली. सलेखने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रदीपचा गळा दाबण्यासाठी वापरलेला साफा देखील हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.