वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:26 IST2025-01-23T18:25:11+5:302025-01-23T18:26:28+5:30
ही क्लीप खोटी असून त्यात माझा आवाज नाही. यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं सांगत पोलीस अधिकाऱ्याने खंडण केले.

वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन?
बीड - खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात चर्चेत असलेला वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात तो बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांच्याशी फोनवरून बोलत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सनी आठवलेवर कारवाई करू नका, तो सध्या माझ्याकडे नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे असं वाल्मीक कराडला अधिकाऱ्याला सांगतो. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या या क्लीपमुळे बीडमध्ये खळबळ माजली आहे. मात्र यातील पोलीस अधिकाऱ्याने हा आवाज माझा नसल्याचं सांगत आरोप फेटाळले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय आहे संवाद?
वाल्मीक कराड - सनीला नका गुंतवू, संशयित म्हणून, त्याची चूक झाली तो माफी मागायला लागलाय.
शीतल बल्लाळ - अरे अण्णा, सनीबद्दल शिफारस करू नका
वाल्मीक कराड - योगेशसोबत जमत नाही म्हणून तो तिकडे गेलाय. हे आपलं पोरगं आहे, काही गोष्टीत मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला.
शीतल बल्लाळ - तुमचा फोन आला म्हणून सहज मदत केली, आता एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितले, तुम्ही एसपी साहेबांना फोन करा.
वाल्मीक कराड - मी एसपी साहेबांशी बोलतो, हवं तर त्यांना माझा फोन आला म्हणून सांगा, स्थानिक राजकारण आहे. माझ्यावर विश्वास ठेवून त्याला मदत करा.
संबंधित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ माजली आहे. मात्र या क्लीपबाबत पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांनी खंडण केले आहे.
काय म्हणाले शीतल बल्लाळ?
सनी आठवले हा आमचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचा भाऊही गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून एका खून प्रकरणात तो फरार आहे. फरार असताना ऑडिओ क्लीप टाकत आहे. बीडमध्ये बनावट नोटा सापडल्या होत्या त्यामध्ये सनी आणि त्याचा भाऊ अक्षय आठवलेवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी अटक करू नये आणि दबाव यावा यासाठी सनी अशा क्लीप व्हायरल करत आहे. मात्र ही क्लीप खोटी असून त्यात माझा आवाज नाही. यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं स्पष्टीकरण पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांनी दिले.
प्रकरण काय?
सनी आठवले नावाच्या युवकाने सोशल मीडियात पोस्ट करून ऑडिओ क्लीप टाकली आहे. त्यात तो म्हणतो की, शीतल बल्लाळ हे वाल्मीक कराडचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्या दीपज्योत माध्यमातून जोडलो होतो. मात्र काही कारणास्तव मी दूर गेलो आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आढळून आलो. त्याचा राग वाल्मीक कराडला होता. सनी आठवलेला कुठल्या तरी गुन्ह्यात अडकवा असं वाल्मीक कराडने बल्लाळ यांना सांगितले. त्यानंतर मला कलम १०७ अंतर्गत शीतल बल्लाळ यांनी पोलीस ठाण्यात बोलावले. मी तिथे गेलो नाही म्हणून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणात माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून नाव जोडले असा आरोप सनीने केला आहे.