वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2025 23:24 IST2025-04-28T23:23:50+5:302025-04-28T23:24:07+5:30
हाऊस किपिंगची सेवा देणाऱ्यांचा गोरखधंदा

वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे गाड्यांमध्ये हाऊस किपिंगची सेवा देणाऱ्यांकडून सिटसाठी धावपळ करणाऱ्या वेटिंगवरील प्रवाशांना चक्क लिनन बॉक्स (चादर, ब्लँकेट ठेवण्याची जागा) मध्ये बसवून प्रवास घडविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपासून एक विशेष तपासणी मोहिम राबविली जात आहे. विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य तसेच विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक राजीव रंजन तसेच कविता नरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या तपासणी मोहिमत प्रत्येक कोचमध्ये संशयीत व्यक्ती आणि प्रतिबंधित सामानाची कसून तपासणी केली जात आहे.
या स्टाफला एका गाडीत काही प्रवासी जेथे चादर, ब्लँकेट ठेवले जाते त्या 'लिनन बॉक्स' मध्ये बसून प्रवास करताना आढळले. त्यांची चाैकशी केली असता त्यांच्याकडे वेटिंग तिकिट आढळले. ऑन बाेर्ड हाउस कीपिंग सर्व्हीस (ओबीएसएस) आणि पेंट्रीकार सर्व्हीस देणारे रेल्वे गाड्यांमधील कर्मचारी अशा वेटिंगवर असणाऱ्या आणि सिटच्या शोधात असणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना लिनन बॉक्स मध्ये बसवत असल्याचे उघड झाले. हा गैरप्रकार करणाऱ्या ओबीएचएसच्या ६ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
सामानाचीही अवैध वाहतूक
या प्रवाशांसोबत काही जण प्रतिबंधित सामानाची अवैध वाहतूक करीत असल्याचेही स्पष्ट झाले. याच तपासणीत ४५३ फुकटे प्रवासीही आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख, ७८ हजार, ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना कडक ताकिदही देण्यात आली आहे. कोणताही गैरप्रकार होत असेल किंवा कसल्याही प्रतिबंधित सामानांची वाहतूक केली जात असेल तर नजिकच्या आरपीएफ कर्मचाऱ्याला किंवा रेल्वेच्या हेल्पलाईन नंबर १३९ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.