VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:11 IST2025-07-22T16:10:11+5:302025-07-22T16:11:56+5:30
Kalyan Fighting Viral Video:कल्याणच्या रूग्णालयातील धक्कादायक प्रकार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
Kalyan Girl Assault: कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली. येथे एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतील पुरूषाने बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये आरोपी पुरूष गोपाल झा हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसत आहे. 'रुग्णालयातील डॉक्टर एमआरआईसाठी (MRI) बसले आहेत, तुम्ही जरा थांबा' इतके तरुणी बोलली होती. त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणीने रुग्णांना काही वेळ वाट पाहण्यास सांगितले होते, त्यामुळे संतापलेल्या गोपाल झा या पुरूषाने संयम गमावत हे कृत्य केले.
नेमके काय घडले?
गोपाल झा नावाचा एक माणूस एका रुग्णाला घेऊन डॉक्टरांना भेटण्यासाठी आला आणि त्याने त्याला ताबडतोब भेटण्याचा आग्रह धरला. रिसेप्शनिस्ट मुलीने त्याला वारंवार समजावून सांगितले आणि वाट पाहण्याची विनंती केली. पण गोपाल झा संतापला. त्याने आपला राग व्यक्त केला आणि मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की सुरुवातीला तो पुरूष त्या तरूणीच्या पोटात लाढ मारतो. नंतर आरोपी मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर खेचतो. यादरम्यान तो तिला अनेक वेळा मारहाण करताना दिसतो. हे दृश्य अत्यंत भयानक आणि मानवतेसाठी लज्जास्पद आहे. पाहा व्हिडीओ-
मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि व्यवस्थापनात घबराट पसरली. पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोपाळ झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.