जयपूरमध्ये शुक्रवारी रात्री भरधाव वेगाचा एक भीषण प्रकार पाहायला मिळाला. ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कारने रस्त्याच्या कडेला असा काही धुमाकूळ घातला की एकच खळबळ उडाली. या अपघाताचा CCTV व्हिडीओ आता समोर आला आहे. ही घटना जयपूरमधील पत्रकार कॉलनीतील खराबास सर्कलजवळ घडली.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वेगाने येणारी ऑडी कार आधी डिव्हायडरला धडकते आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या, टपऱ्या आणि वाहनांना चिरडत पुढे जाते. सुमारे ३० मीटरपर्यंत ही कार मृत्यूचं तांडव करत धावत होती. याच दरम्यान १२ पेक्षा जास्त हातगाड्या आणि टपऱ्या उलटल्या, तर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कारही या धडकेने पलटी झाली.
भीषण अपघातात एकूण १६ जण चिरडले गेले. त्यापैकी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुहाना आणि पत्रकार कॉलनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने एसएमएस (SMS) रुग्णालय आणि जयपूरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला दररोजप्रमाणे फास्ट फूड आणि इतर वस्तूंच्या गाड्या लागल्या होत्या. अचानक भरधाव ऑडी कार लोकांना उडवत पुढे गेली. जर काही लोकांनी वेळीच इकडे-तिकडे धाव घेतली नसती, तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश निर्माण झाला आणि संतप्त लोकांनी कारमधील दोन तरुणांना पकडून बेदम चोप दिला.
अपघाताच्या वेळी ऑडी कारमध्ये चार जण स्वार होते. प्राथमिक तपासात चालक नशेत असल्याचं समोर आलं आहे. नशेत असलेला चालक आणि त्याचा एक साथीदार अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात कारचा वेग अत्यंत जास्त असल्याचं आढळलें आहे. CCTV फुटेज ताब्यात घेऊन तपास केला जात आहे. ऑडी कार जप्त करण्यात आली असून अपघाताशी संबंधित सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.
Web Summary : In Jaipur, a speeding Audi killed one and injured fifteen after hitting multiple vehicles and stalls. The driver, suspected of being intoxicated, fled the scene with an accomplice. Police are investigating the incident captured on CCTV.
Web Summary : जयपुर में तेज रफ्तार ऑडी ने कई वाहनों और ठेलों को टक्कर मारी, जिसमें एक की मौत हो गई और पंद्रह घायल हो गए। नशे में धुत ड्राइवर एक साथी के साथ मौके से फरार हो गया। पुलिस सीसीटीवी फुटेज से जांच कर रही है।