सांगवीत वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न, एका अल्पवयीनसह 3 संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:53 IST2020-07-23T13:32:43+5:302020-07-23T15:53:36+5:30
दारूच्या नशेत कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड

सांगवीत वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न, एका अल्पवयीनसह 3 संशयित ताब्यात
पिंपरी : जुनी सांगवी परिसरात रात्री दोनच्या सुमारास १५ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (दि. २३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगवीपोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, जुनी सांगवी परिसरातील ढोरेनगर, समता नगर, मुळा नगर, पवना नगर, प्रियदर्शनी नगर अशा सुमारे दोन किलोमीटर परिसरात तीन संशयित आरोपी यांनी पंधरावर खासगी वाहनांच्या काचा फोडून व वाहनांचे नुकसान केले. यात एक रुग्णवाहिका, स्कूलबस व इतर चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
संगम नगर, पवना नगर व खडकी येथील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एकावर यापूर्वी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाहनतोडफोडप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.