लोकमत न्यूज नेटवर्क, केज (जि. बीड): तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या विष्णू चाटेला शुक्रवारी दुपारी केज न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी दिले आहेत. तर वाल्मीक कराड १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीतच असणार आहे.
मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबातून विष्णू चाटे याचेही सहआरोपी म्हणून या गुन्ह्यात नाव आहे. तर, ११ डिसेंबर रोजी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा केज पोलिसात नोंद झाला होता.
दोन्ही प्रकरणांत चाटे आरोपी असला तरी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली आहे. दोन वेळा मिळून न्यायालयाने एकूण १९ दिवस चाटेला पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सीआयडी व एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली. मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
उद्या न्यायालयात हजर करणार?
- दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी सीआयडी व एसआयटी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज करून सरपंच हत्येप्रकरणी चौकशी करण्याकामी पुन्हा ताब्यात देण्यासाठी अर्ज केला आहे.
- त्यामुळे चाटे याला न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे. सरपंच हत्येप्रकरणी त्याला शनिवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाठराखणीनंतर मुंडेंनी घेतली भुजबळांची भेट
- बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांची शुक्रवारी अचानक भेट घेतली.
- भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कुणाचे मंत्रिपद काढून मला नको अशी भूमिका घेतली होती. तसेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांची पाठराखणही केली होती.
- भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलेले असल्याने या खात्यातील कामकाजासंबंधी त्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे मुंडे यांनी या भेटीबाबत सांगितले.