येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 23:57 IST2025-06-10T23:57:21+5:302025-06-10T23:57:53+5:30
शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार केल्याप्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगवणे याला अटक केली होती. मात्र, गुन्ह्यात जामीनपात्र कलमे लावल्याने त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. लगेचच न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर देखील केला होता. याला काही तास होत नाही तोच पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून शशांक हगवणे व निलेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे.
वारजे माळवाडी पोलिसांनी रात्री उशिरा शशांक हगवणे व निलेश चव्हाणचा ताबा घेतला आहे. शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचाही ताबा घेण्यात आला आहे. पुणे पोलिस उद्या दुपारी या दोघांना देखील न्यायालयासमोर हजर करणार आहेत.
सुशील राजेंद्र हगवणे प्रकरणात काय झाले...
पोलीस हवालदार मंगेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे पल्लवी काशिद यांनी न्यायालयात बाजू मांडली. २९ जुलै २०२२ ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तो आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांचा दीर आहे. त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना न्यायालयाच्या परवानगीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हगवणे याच्यावर कलम भारतीय दंड संहिता 177, 191, 192, 193, 417, 419 व शस्त्रास्त्र प्रतिबंध कायदा कलम 30, नियम 11 (8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही कलमे जामीनपात्र आहेत, तरीही तपास अधिका-यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला आरोपीचे वकील अँड. स्वानंद गोविंदवार यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर केला.