‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार, वृद्ध महिलेची 3 कोटी रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:55 IST2026-02-22T17:53:51+5:302026-02-22T17:55:09+5:30

महिलेला तब्बल 60 दिवस 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवले.

Uttarakhand News Shocking case of 'digital arrest', elderly woman cheated of Rs 3 crore | ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार, वृद्ध महिलेची 3 कोटी रुपयांची फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार, वृद्ध महिलेची 3 कोटी रुपयांची फसवणूक

उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे सायबर ठगांनी ‘डिजिटल अरेस्ट’ करत 70 वर्षीय महिलेची तब्बल 3.09 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठगांनी स्वतःला CBI अधिकारी म्हणून सांगितले अन् व्हिडीओ कॉलवरून धमक्या दिल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल 60 दिवस सुरू होता.

60 दिवस मानसिक दबाव; व्हिडीओ कॉलवर धमकावले...

पोलिसांच्या माहितीनुसार, ठगांनी तब्बल 60 दिवस पीडित महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले. सतत व्हिडीओ कॉल करून तिला घाबरवण्यात आले. पीडित महिलेने शुक्रवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

CBI अधिकारी असल्याचा बनाव; मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2025 रोजी तिला पहिला व्हिडीओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला CBI अधिकारी सांगितले. त्याने दावा केला की, महिलेचा मोबाईल नंबर 68 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समोर आला असून, लवकरच तिला अटक करून तुरुंगात पाठवले जाईल.

मुलांवर कारवाईची धमकी

ठगांनी महिलेला स्पष्ट इशारा दिला की, जर ही बाब कुणालाही सांगितली, तर तुमच्या मुलांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल. या धमकीमुळे महिला पूर्णपणे घाबरून गेली आणि ठगांच्या जाळ्यात अडकली.

तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत देण्याचा दावा

आरोपींनी सांगितले की, अटक टाळायची असेल, तर तपासासाठी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करा. तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल. या दबावाखाली महिला सप्टेंबर 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत 3.09 कोटी रुपये ट्रान्सफर करत गेली. इतकी मोठी रक्कम उभारण्यासाठी पीडित महिलेला फिक्स्ड डिपॉझिट (FD) तोडावी लागली, शेअर्स विकावे लागले, दागिनेही गहाण ठेवावे लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत सर्व पैसे खात्यातून गेले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगाने सुरू आहे. ठगांनी वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत, ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले, त्यांची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे.

‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचा वाढता धोका

हा प्रकार पुन्हा एकदा दाखवतो की, ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या नव्या पद्धतींनी सायबर ठग लोकांवर मानसिक दबाव टाकून कोट्यवधींची फसवणूक करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : डिजिटल अरेस्ट घोटाला: बुजुर्ग महिला को ₹3 करोड़ का चूना

Web Summary : देहरादून: साइबर ठगों ने 'डिजिटल अरेस्ट' का इस्तेमाल कर 70 वर्षीय महिला को ₹3.09 करोड़ का चूना लगाया। सीबीआई अधिकारी बनकर वीडियो कॉल से धमकाया और जांच के नाम पर पैसे वसूले, यह घोटाला 60 दिनों तक चला।

Web Title : Digital Arrest Scam: Elderly Woman Loses ₹3 Crore

Web Summary : Dehradun: Cyber thugs used 'digital arrest' to defraud a 70-year-old woman of ₹3.09 crore. Posing as CBI officers, they threatened her via video calls for 60 days, extorting money under the guise of investigation.