पोलिसांना पाहून पळाला आणि जाळ्यात अडकला; चौकशीच सायकल चोर निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 20:57 IST2022-09-19T20:57:24+5:302022-09-19T20:57:47+5:30
उत्तरप्रदेशचा सराईत सायकल चोर जाळ्यात, २७ सायकल जप्त

पोलिसांना पाहून पळाला आणि जाळ्यात अडकला; चौकशीच सायकल चोर निघाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गस्तीदरम्यान पोलिसांना पाहून पळाल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत तरुणाला पकडले. चौकशीत तो सराईत चोर असल्याचे समोर आले. रईस तावर खान (३८) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून विविध परिसरातून चोरी केलेल्या २७ सायकल जप्त करण्यास शाहू नगर पोलिसांना यश आले आहे.
शाहू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिम फाटक परिसरातील पादचारी पुलाखालील परीसरात पोलिसांना पाहून खानने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करताच तो धारावीत राह्ण्यास असून मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले. शाहू नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.
त्याने, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून नामांकित कंपन्यांच्या सायकल चोरी करत शाहूनगर पोलीस ठाणे हद्दीतील सिटीझन बेकरी, एम्ब्रॉयडरी कारखाना, टेनरी कंम्पाउण्ड, शेठवाडी येथील आडोसा असलेल्या जागेत प्लास्टीकचा कपडा झाकून ठेवल्याचे सांगताच पथकाने अडीच लाख किंमतीच्या २७ सायकल जप्त केल्या आहे. त्याच्या विरोधात वांद्रे, खार, शिवाजी पार्क, डीबीमार्ग, विलेपार्ले, दादर पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.