लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरारोडमधील एका गृह संकुलात गाडी घेऊन येणाऱ्या तीन तरुणांना सुरक्षारक्षकांनी कुठे जायचे म्हणून विचारणा केल्याचा राग येऊन त्यांनी पिस्तूल दाखवत 'गाझियाबाद दिखा देंगे' असे धमकावत अंगावर गाडी घालून सुरक्षारक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात तिघे सुरक्षारक्षक यांना मार लागला असून काशीगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमका काय घडला प्रकार?
मीरारोड भागात जेपी नॉर्थ बार्सिलोना गृहसंकुल आहे. त्या संकुलाच्या सी विंगच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी सकाळी काळी कार आली असता, तेथील रखवालदाराने कोणत्या फ्लॅटमध्ये जायचे याबद्दल विचारणा केली. हे ऐकून तिघांचाही पारा चढला. त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत सुरक्षारक्षकाच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर एकाने उतरून सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करण्यास व जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. तर गाडी चालवणाऱ्याने पुन्हा शिवीगाळ करत गाझियाबाद दाखवू असे धमकावत पुन्हा सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घातली. सुरक्षा रक्षकांना पिस्तूल दाखवून धमकावण्यात आले. नंतर गाडी घेऊन तिघेही पळून गेले.
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
या घटनेत तिनही सुरक्षारक्षकांना मार लागला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात तिघांवर हत्येचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मोबाईलमध्ये देखील काही व्हिडीओ काढले गेले आहेत.
दोन आरोपींची ओळख पटली!
तिघांपैकी दोन आरोपींची ओळख पटली असून कशिश गुप्ता व त्याचा भाऊ अक्षित गुप्ता अशी त्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस पथके नेमली आहेत. आरोपी हे या संकुलात भाड्याने राहण्यास असून त्या आधी ते दहिसर येथे रहात होते. त्यांच्यावर आधीही काही गुन्हे दाखल आहेत.