UP Crime: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका हृदयद्रावक घटनेने शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडले आहे. डीएव्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याने पेट्रोल टाकून स्वतःला आग लावली. कॉलेजच्या प्राध्यापकाने फी जमा न केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्म देण्यास नकार दिला होता ज्यामुळे तो परीक्षेस मुकणार होता. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
उज्ज्वल राणा नावाचा हा विद्यार्थी डीएव्ही पीजी कॉलेज, बुढाणा येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने फीस भरली नसल्यामुळे प्राध्यापकाने त्याला परीक्षेचा फॉर्म देण्यास नकार दिला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थी उज्ज्वल राणा स्पष्टपणे म्हणत आहे की, प्रिन्सिपलने इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचा खूप अपमान केला आणि इथे धर्मशाळा उघडलेली नाहीये, असे विधान केले. या अपमानाने संतापलेल्या उज्ज्वलने आपल्या बॅगमधून पेट्रोलची बाटली काढली, स्वतःवर पेट्रोल ओतून आग लावून घेतली.
आग लागल्यानंतर उज्ज्वल जळत्या अवस्थेत क्लासरूमच्या दिशेने धावला. त्याच्यामागे त्याचे साथीदार धावले आणि त्यांनी स्कूल बॅग व पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात आणखी एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. उज्ज्वल ७० टक्क्यांहून अधिक भाजला असून, त्याला तातडीने दिल्लीला हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्राध्यापकावर मारहाणीचा आरोप
प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी शोभन याने या घटनेनंतर कॉलेज व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. शोभनने सांगितले की, गुरुवारी प्राध्यापकाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांसोबत उज्ज्वलला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पीटीआयनेही त्याला एका खोलीत बंद करून मारले. एवढेच नाही तर, पोलिसांनी उज्ज्वलला समर्थन देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती.
शोभनच्या म्हणण्यानुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उज्ज्वलने शिक्षकांसमोरच स्वतःवर पेट्रोल टाकले आणि माचिस हातात घेतली, परंतु कोणत्याही शिक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व जण फक्त उभे राहून पाहत राहिले. उज्ज्वल जळत असताना शिक्षक दूर पळून गेले. विद्यार्थ्यांनीच आग विझवली. गंभीर बाब म्हणजे, कॉलेजमध्ये गाडी उभी असूनही त्याला अर्धा तास तडफडत ठेवले गेले. नंतर पोलीस आणि रुग्णवाहिका आल्यावर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले.
खाकरोबान गावातील रहिवासी असलेल्या उज्ज्वलची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याचे प्रति सेमेस्टर १० हजार रुपये शुल्क होते. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याची आई हयात नाही आणि त्याचे वडील हरेंद्र उर्फ बॉबी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. उज्ज्वलच्या आजोबांनी सांगितले की, उज्ज्वलची खूप जास्त फी थकबाकी नव्हती, काहीच पैसे बाकी होते. तरीही प्राध्यापकाने त्याच्यासोबत गैरवर्तन केले आणि मारहाण केली, ज्यामुळे त्याने इतके मोठे पाऊल उचलले.
या संपूर्ण प्रकरणावर प्राध्यापक प्रदीप कुमार यांनी आणखी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. "आम्ही कोणतीही धर्मशाळा उघडलेली नाहीये. फीस न भरल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला बोललो आहे, तर त्याने त्यासाठी आत्महत्या केली तर करावी. आम्ही त्याच्यासोबत कोणतीही मारहाण केलेली नाही. त्याने आत्मदहनाचा प्रयत्न करताच आम्ही पोलिसांना बोलावले. आम्ही घाबरून बसणारे नाही, जे होईल ते पाहिले जाईल," असं प्राध्यापकाने सांगितले.
Web Summary : Upset over being denied his exam form due to unpaid fees and subsequent humiliation by a professor, a student in Uttar Pradesh set himself on fire. Seriously injured, he is now in critical condition. Allegations of prior assault by the professor have also surfaced.
Web Summary : उत्तर प्रदेश में फीस न भरने और प्रोफेसर द्वारा अपमानित किए जाने पर एक छात्र ने खुद को आग लगा ली। परीक्षा फॉर्म से वंचित होने पर गुस्से में आकर उसने यह कदम उठाया। छात्र गंभीर रूप से घायल है, और प्रोफेसर पर मारपीट के आरोप लगे हैं।