उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महाराजगंज तराई पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या जुगलीकला गावात ही घटना घडली. सासरच्या घरी गेलेल्या एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या आरोपाखाली पोलिसांनी त्याची पत्नी आणि बॉयफ्रेंडसह सात जणांना अटक केली आहे. रविवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पोलिस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेंद्र वर्माची पत्नी उमा देवीचे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील तरुण जितेंद्र वर्मासोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी सांगितलं की दोघांनीही हरेंद्र वर्मा यांना संपवण्याचा कट रचला. पत्नी उमा देवीने हरेंद्र वर्माला तिच्या भावाच्या लग्नासाठी माहेरी बोलावलं. लग्नाच्या दिवशी त्याच्या सासरच्यांनी लग्नानंतर ते त्याची पत्नी उमा देवीला सोबत घेऊन जायला सांगितलं.
शुक्रवारी रात्री जितेंद्र वर्माने हरेंद्र वर्माला एका ठिकाणी बोलावलं आणि नंतर त्यांच्या मित्रांसह चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली. पोलिसांनी हत्येत सहभागी असलेल्या सात जणांना अटक केली आहे, ज्यात पत्नी उमा देवी, बॉयफ्रेंड जितेंद्र वर्मा, मुकेश कुमार, सचिन यादव, अखिलेश यादव, संतोष, मुकेश साहू यांचा समावेश आहे.
उमा देवीचं लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनेत वापरलेले सहा मोबाईल, दोन बाईक, रक्ताने माखलेले कपडे, बूट आणि हत्येत वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं एसपींनी सांगितलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.