पाटणा : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांमध्ये गोळीबार होऊन एकजण ठार झाला. बिहारच्या भागलपूरजवळ राहणाऱ्या या दोन भावांमध्ये मागील एक वर्षापासून वाद सुरू होता व त्यातूनच गोळीबार झाला.
गोळीबारात विकल यादव जागीच ठार झाला, तर जयजित यादव गंभीर जखमी झाला. यात नित्यानंद राय यांच्या बहिणीलाही गोळी लागली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही भावांना समजावण्यास त्यांची आई मध्ये पडली असता तिच्या हाताला गोळी लागली. दोन्ही भावांमध्ये पाण्यावरून वाद झाला. दोघांनी मिळून तीन गोळ्या झाडल्या. त्यांतील एक गोळी विकलला, तर दोन गोळ्या जयजितला लागल्या. दोन्ही भावांत चांगले संबंध नव्हते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. वाद झाल्यानंतर विकलने घरात जाऊन पिस्तूल आणले. त्याने जयजितवर गोळी झाडली.