अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी जामीन मिळाल्यानंतर सेनेगलमधून फरार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 15:53 IST2019-06-11T15:49:44+5:302019-06-11T15:53:44+5:30
न्यायालयाने जामीन मंजूर करताच तुरूंगाबाहेर आलेल्या पुजारीने त्याच संधीचा कायदा घेऊन पळ काढला

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी जामीन मिळाल्यानंतर सेनेगलमधून फरार?
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आफ्रिकन देश सेनेगलमधून फरार झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. २१ जानेवारीला पुजारीला अटक झाली होती. सेनेगल न्यायालयाने जामीन मंजूर करताच तुरूंगाबाहेर आलेल्या पुजारीने त्याच संधीचा कायदा घेऊन पळ काढला आहे असा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी संशय व्यक्त केला आहे.
भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागू नये म्हणून पुजारीने सेनेगलमध्ये स्वत:वरच बनावट फसवणुकीचा खटला दाखल केला होता. सेनेगल न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत देश सोडण्यास मनाई करण्यात आली होती. तरी देखील पुजारीने पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. सेनेगलला लागूनच बुर्किना फासो, माली आणि आयवरी कोस्टसारखे देश आहेत. त्यामुळेच पुजारीला पळून जाणं सोपं झाल्याचा तर्क लावला जात आहे. सेनेगलमध्ये राहत असलेल्या रवी पुजारीला भारतात परत आणण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा प्रयत्न करत होती. सेनेगलला येण्याआधी पुजारी बर्किना फासो इथं राहत होता. त्याला बुर्किना फासो देशाचं नागरिकत्व मिळाल्याचाही दावा केला जात आहे. त्यांने आपलं नाव बदलून अँथनी फर्नांडीस ठेवल्याचं म्हटलं जात आहे. रवी पुजारीविरोधात भारतात २०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. शिवाय २ अधिकाऱ्यांची टीम मुंबईहून सेनेगलला रवाना झाल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे.