Uncle's life saved by changing date of murder | हत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव

हत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव

ठळक मुद्देपोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले.

नालासोपारा - काकाची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या पुतण्यासह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने जेरबंद करत हत्येचा डाव उधळून लावल्याची घटना घडली आहे. हत्येची तारीख बदलल्यामुळेच व्यापारी काकाचा जीव वाचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलामांअन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका व्यापाऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली असून त्याची लवकर हत्या केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वसई युनिटच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 जणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर ही धक्कादायक व खरी माहिती उजेडात आली. नालासोपारा शहरात राहणारे रोशनलाल गुप्ता हे व्यापारी असून परिसरातील बेकऱ्या आणि अनेक दुकानांना होलसेल भावात तेल आणि मैदा पोहचवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता उर्फ मॉन्टी याचा सुद्धा हाच व्यवसाय असून तो याच परिसरात करत होता. काका आणि पुतण्या या दोघांमध्ये याच व्यवसायावरून वाद असल्याने भांडणे होत होती. काही महिन्यांपासून पुतण्या मिथिलेश हा आजारी असल्याने तो एका मांत्रिकाकडे गेला होता. त्या मांत्रिकाने सांगितले की, तुझ्या काकाने तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे. ही गोष्ट माहिती मिळाल्यावर नाराज झालेल्या पुतण्याने काकाची हत्या करण्याचा डाव आखून हत्येची सुपारी देण्याचा विचार केला होता. त्याने नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची २ लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले. अन्सारीने हत्येसाठी मोहम्मद परवेज अन्सारी, अजय बिडलान, रिजवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता त चार मित्रांना तयार केले. काकाला दाखवण्यासाठी पुतण्या या पाचही आरोपींना १ सप्टेंबरला नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथे घेऊन गेला होता. त्या सर्वांना लांबूनच काकाला दाखवून हत्येसाठी तारीख आणि वेळ पुतण्याने ठरवली पण काहींना काही अडचण येत असल्याने अनेक वेळा हत्येच्या तारखा आणि वेळ बदली झाल्याने हत्या करण्यात आरोपींना यश आले नाही. यातच पोलिसांना माहिती मिळाल्यावर हत्येचा डाव उधळून 6 आरोपींना अटक करत व्यापारी काकाचा जीव पोलिसांनी वाचवला आहे.

 

व्यवसायातील वादामुळे आणि तांत्रिकाने करणी केल्याचे सांगितल्याने पुतण्याने काकाचा काटा काढण्याचा डाव आखून २ लाख रुपयांची ५ आरोपींना सुपारी दिली होती. हत्येचा डाव उधळून लावत ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - जितेंद्र वनकोटी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)

Web Title: Uncle's life saved by changing date of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.