दोन तरुणींनी महिलेची गळा आवळून केली हत्या, दोघींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:53 IST2019-11-30T00:53:19+5:302019-11-30T00:53:50+5:30
व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असणाऱ्या दोन तरुणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा प्रकार टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी गुरुवारी दोन्ही तरुणींना अटक केली.

दोन तरुणींनी महिलेची गळा आवळून केली हत्या, दोघींना अटक
टिटवाळा : व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असणाऱ्या दोन तरुणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा प्रकार टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी गुरुवारी दोन्ही तरुणींना अटक केली.
रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात किशोरी सावंत (३४) हिच्यासह ईशा पांडे आणि विशाखा कोटावे या १९ वर्षांच्या दोन तरुणी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. किशोरीमुळे आपल्याला या केंद्रातून सुटी मिळत नाही, असा भ्रम ईशा व विशाखा या दोघींना झाला होता. त्यामुळे त्या किशोरीकडे रागाने बघायच्या. या केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी दोघींनी किशोरीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी तिच्या जेवणात उवा मारण्याचे औषध मिसळवले.
त्यानंतर दोघींनी ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर दोघींनी किशोरीने आत्महत्या केल्याची बोंब ठोकली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हा गुन्हा टिटवाळा पोलिसांकडे वर्ग झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे यांनी तपास केला.
वैद्यकीय तपासणीत किशोरीचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी ईशा व विशाखा या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून किशोरी सावंतच्या हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी दोन्ही तरुणींविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.