धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:19 IST2025-10-07T20:19:09+5:302025-10-07T20:19:37+5:30
शाम घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१) अशी या मुलांचे नावे आहेत.

धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): विरारच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे.
विरारच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुऱक्षारक्षकाला जोरदार पडल्याचा आवाज आला. दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिस घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून पंचनामा केला आहे. या दोन्ही तरुणांची ओळख पटली आहे. शाम घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१) अशी या मुलांचे नावे आहेत.
ही दोन्ही तरुणे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात राहत होती. ते दोघे नालासोपारा पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. त्यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत चौकशी करत तपास सुरू असल्याचे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माझ्या मुलासह शाम या दोघांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या असल्याचे आदित्यचे वडील राज सिंग यांनी आरोप केला आहे. माझ्या मुलाला बोलवण्यासाठी दोघे आले होते व तिघे एकत्र गेले होते. पोलिसांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा असे आदित्यच्या वडिलांनी विनंती केली आहे.