गडचिरोलीत खंडणी मागणाऱ्या दोन तोतया नक्षलवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:15 IST2019-02-18T17:14:51+5:302019-02-18T17:15:22+5:30
नक्षलवादी असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याला १० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २ लाख रुपये प्रत्यक्ष घेणाऱ्या दोन तोतया नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

गडचिरोलीत खंडणी मागणाऱ्या दोन तोतया नक्षलवाद्यांना अटक
आष्टी (गडचिरोली) - नक्षलवादी असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याला १० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २ लाख रुपये प्रत्यक्ष घेणाऱ्या दोन तोतया नक्षलवाद्यांना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. ही कारवाई आष्टी येथे करण्यात आली. तिघांपैकी एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
अब्दुल सलीम अब्दुल रहीम शेख (३३) रा.ठाकरी, प्रकाश निताई सरदार (३२) रा.आष्टी अशी अटक करण्यात आलेल्या तोतया नक्षलवाद्यांची नावे आहेत. नक्षल चळवळीसाठी पैशांची गरज आहे, त्यामुळे १० लाख रूपये द्या, असे पत्र त्यांनी आष्टी येथील एका व्यापाºयाच्या घरी टाकले. त्यानंतर व्यापाऱ्याला फोन करून पहिली किस्त म्हणून दोन लाख रूपये देण्याची मागणी केली. त्या व्यापाऱ्याने पोलिसांकडे संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून रविवारी रात्री आष्टी येथील महात्मा फुले विद्यालयासमोर सापळा रचण्यात आला. यावेळी दोन लाख रूपये स्वीकारताना दोन आरोपींना अटक करण्यात आली.
सदर कारवाई अहेरीचे एसडीपीओ बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे ठाणेदार रंजन निर्मल, पीएसआय जयदीप पाटील, एएसआय संघरक्षित फुलझेले, हवालदार दादा राठोड, विनोद गौरकार आदींच्या पोलीस पथकाने केली.