कल्याण - उधार घेतलेले पैसे परत न केल्याचा राग मनात धरुन दोघा भावांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करुन गोळी झाडत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तानाजी काठे (३८, रा. डोंबिवली) याच्यासह विनय अय्यर, संजय आणि अन्य एकाविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी विनयला अटक केली आहे.
शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मंगेश शेलार (२५, रा. दत्तनगर) इमारतीच्या आवारात उभा असताना तानाजीसह त्याचे साथीदार मोटारीने याठिकाणी आले. त्यांनी मंगेशला जबरदस्तीने मोटारीत बसवत खंबाळपाडा परिसरात नेले. याठिकाणी उधार दिलेल्या दोन लाख रुपयांची मंगेशकडे मागणी करण्यात आली. पैसे परत केले नाही तर, फार्महाऊसवर नेवून गोळी घालण्याची धमकी तानाजीने मंगेशला दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मंगेशने त्याचा मावस भाऊ सोमनाथ देवकर याला संबंधित प्रकाराची माहिती देत याठिकाणी बोलावले. भावाने बोलावल्यावर आलेल्या सोमनाथ आणि मंगेशला चौघांनी मिळून जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना पुन्हा मोटारीत बसवून मुरबाड येथील सरळगाव परिसरात असलेल्या एका फार्महाऊसवर नेण्यात आले. फार्महाऊसवर गेल्यावर दोघांकडे पैशांची मागणी करत पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी, सोमनाथला येथील स्विमिंगपूलमध्ये देखील बुडविण्यात आले. यासर्व प्रकारामुळे घाबरलेल्या दोघांनी पैसे देण्याची कबुली दिली. त्याचवेळी, तानाजीने स्वत:कडील बंदुकीने सोमनाथच्या दिशेने गोळी झाडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जखमी झालेल्या मंगेशवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.